जागतिक महिला दिनानिमित्त नगरसेविकांना इनडोअर प्लांटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:56+5:302021-03-09T04:43:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : समाजातील नागरिकांचे ठाणे महापालिकेत प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व नगरसेविकांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त महापौर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : समाजातील नागरिकांचे ठाणे महापालिकेत प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व नगरसेविकांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ग्रीन कल्चर, ठाणे यांच्या सहकार्याने महिला नगरसेविकांना इनडोअर प्लांटचे वाटप करण्यात आले. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात कोरोना नियमांचे पालन करीत महापौर दालनातच छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.
दरवर्षी राम गणेश गडकरी रंगायतन येथे कर्मचाऱ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी महिला दिन साजरा केला जातो. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच कार्यक्रमांवर बंधने आल्यामुळे ही परंपरा खंडित न करता छोटेखानी स्वरूपात हा कार्यक्रम महापौर दालनात केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, ग्रीन कल्चर नर्सरी ठाणेचे तुषार शेटे, नाजमीन शेख, वैभव पागीरे आदी उपस्थित होते.
यावेळी ठाणे महापालिकेच्या पाच विशेष समित्यांच्या सभापती व नऊ प्रभाग समितीच्या अध्यक्षांना सन्मानित करण्यात आले. यंदा प्रथमच सर्वच समित्यांवर ९० टक्के महिलांचे वर्चस्व आहे. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात क्रीडा, समाजकल्याण व सांस्कृतिक समिती सभापती प्रियांका पाटील, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय साहाय्य समिती सभापती निशा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती राधाबाई जाधवर, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती साधना जोशी, नौपाडा प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, लोकमान्य सावरकरनगर् प्रभाग समिती अध्यक्षा आशा डोंगरे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा राधिका फाटक, उथळसर प्रभाग समिती अध्यक्षा वहिदा मु्स्तफा खान, कळवा प्रभाग समिती अध्यक्षा वर्षा मोरे, दिवा प्रभाग समिती अध्यक्षा सुनीता मुंडे यांना महापौर आणि आयुक्त यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
..................
समाजकल्याणासाठी झटण्याचे आवाहन
इनडोअर प्लांट हे सावलीत व कमी पाण्यातही निसर्गामध्ये आपले अस्तित्व टिकवून राहते. सदैव हिरवेगार राहून दुसऱ्यांना आनंद देणे हे या झाडांचे वैशिष्ट्य आहे, त्याचप्रमाणे प्रत्येकाने समाजामध्ये वावरत असताना परिस्थितीनुरूप कार्यरत राहावे, वेळप्रसंगी कोणाचाही आधार नसेल तरी समाजाच्या कल्याणासाठी सतत झटत राहावे, असे आवाहन महापौर म्हस्के यांनी यावेळी केले.