मीरा भाईंदरमध्ये लसीसाठी पालिकेच्या टोकनचे चक्क नगरसेवक कार्यालयातून वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:45 AM2021-09-15T04:45:47+5:302021-09-15T04:45:47+5:30

मीरा रोड : मीरा भाईंदर महानगरपालिकेची लस घेण्यासाठीचे टोकन नगरसेवक स्वतःच्या कार्यालयात बसून वाटत असल्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप ...

Distribution of Municipal Tokens for Vaccine in Mira Bhayander from Chakka Councilor's Office | मीरा भाईंदरमध्ये लसीसाठी पालिकेच्या टोकनचे चक्क नगरसेवक कार्यालयातून वाटप

मीरा भाईंदरमध्ये लसीसाठी पालिकेच्या टोकनचे चक्क नगरसेवक कार्यालयातून वाटप

googlenewsNext

मीरा रोड : मीरा भाईंदर महानगरपालिकेची लस घेण्यासाठीचे टोकन नगरसेवक स्वतःच्या कार्यालयात बसून वाटत असल्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पालिका टोकनची काळाबाजारी करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे सामान्य नागरिकांना लस घेण्यासाठी टोकन मोठ्या हालअपेष्टा सहन करून मिळत असताना, नगरसेवकांना पालिकेचे टोकन मिळणे गंभीर आहे.

मीरा भाईंदर महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत महापालिकेच्या संगनमताने काही नगरसेवक, राजकारणी हस्तक्षेप करत वशिलेबाजी चालवत असल्याचे गैरप्रकार या आधीदेखील उघडकीस येऊनही महापालिका प्रशासन मात्र कारवाईऐवजी गैरप्रकारांना संरक्षण व प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. त्यातच बुधवार, ८ सप्टेंबर रोजी महापालिकेने ३७ केंद्रांवर जंबो लसीकरण मोहीम ऑफलाइन पद्धतीने आयोजित केली होती. त्यासाठी केंद्रांवर लोकांनी दिवसरात्र रांगेत उभे राहून टोकन घेतले व नंतर लस घेतली. बहुतांश ठिकाणी मध्यरात्रीनंतर, तर काही ठिकाणी पहाटेपर्यंत लोक रांगेत होते. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील मात्र लसीकरण केंद्रांवर दिली जाणारी टोकन स्वतःच्या खासगी कार्यालयात बसून देत असल्याचा धक्कादायक प्रकार व्हायरल क्लिपने उघडकीस आला आहे.

या व्हिडिओत एका व्यक्तीस पालिकेचे टोकन दिले व टेंबा येथे लसीकरण केंद्रांवर जाण्यास स्वतः पाटील यांनी सांगितले.

ऑडिओ क्लिपमध्येसुद्धा मीरा रोडवरून आलेल्या एका महिलेस पाटील हे टेंबा लसीकरण केंद्रावर जा, तिथे लाइन लावायची गरज पडणार नाही, आदी वक्तव्ये करत असल्याचे समोर आले आहे.

एकीकडे सामान्य नागरिक लस आणि टोकनसाठी रांगेत हाल सहन करत तासन्तास उभे राहतात. अनेक नगरसेवक, राजकारणीसुद्धा लसीच्या नियोजनासाठी खटपट करत असतात; पण येथे मात्र नगरसेवक पाटील हे त्यांच्या खासगी कार्यालयात बसून लससाठी टोकन देत असल्याने खळबळ उडाली आहे.

.............

व्हिडीओ निदर्शनास आला असून, आयुक्तांच्या आदेशानुसार याबाबत चौकशी केली जाईल.

- डॉ. प्रकाश जाधव, पालिका प्रभारी वैद्यकीय प्रमुख.

Web Title: Distribution of Municipal Tokens for Vaccine in Mira Bhayander from Chakka Councilor's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.