उल्हासनगरात घरघंटी व शिलाई मशीनचे आचारसंहिता काळात वाटप? महापालिकेचे कानावर हात
By सदानंद नाईक | Published: April 3, 2024 05:45 PM2024-04-03T17:45:14+5:302024-04-03T17:46:17+5:30
मनसेची कारवाईची मागणी
सदानंद नाईक, उल्हासनगर: निवडणूक आचारसंहितेमुळे घरघंटी व शिलाईमशीनचे वाटप महापालिकेने थांबविल्याचे सांगूनही, घरघंटी व शिलाईमशीनचे वाटप करते कोण? असा प्रश्न मनसेने करून कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली. शहरात घरघंटी व शिलाईमशीन वाटप होत असल्याचे प्रकार उघड झाले आहे.
उल्हासनगर महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याणकारी योजने अंतर्गत ३ हजार २९८ शिलाईमशीन व घरघंटीसाठी महिलांकडून अर्ज मागविले होते. अर्जाची छाननी करून पात्रता यादीतील अर्जाची लॉटरी काढली. त्यानंतर विभागाने लॉटरीतील पात्र महिलांची यादी प्रसिद्ध केली. १३ मार्च रोजी यंत्र वाटपाचा प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम प्रांतकार्यालय प्रांगणात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाला. मात्र त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने, शिलाई मशीन व घरघंटी वाटपाचा कार्यक्रम थांबविण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यानंतरही एका महापालिका शाळेसह अन्य ठिकाणाहून महिलांना शिलाई मशीन व घरघंटी यंत्र वाटप होत असल्याचे उघड झाले. मनसेने महापालिका आयुक्त अजीज शेख यांना याबाबत चौकशीबव कारवाईची मागणी केली आहे.
* मशीनचे वाटप वादात
महापालिकेने शिलाईमशीन व घरघंटी वाटप निवडणूक आचारसंहितेनंतर करण्यात येईल असे सांगूनही शहरात शिलाई मशीन व घरघंटीचे वाटप सुरू असल्याचा भांडाफोड झाला. याप्रकाराने मशीनचे वाटप वादात सापडले आहे.
* निवडणूक विभागातील ते कर्मचारी कोण?
घरघंटी व शिलाई मशीन वाटपाचे काम करणारे काही कर्मचारी महापालिका निवडणूक विभागात बसल्याचा आरोप मनसेने केला. त्या कर्मचाऱ्यांना बसण्याची परवानगी महापालिकेने दिली का? असा प्रश्न निर्माण झाला. असाच प्रकार यापूर्वी नगररचनाकार विभागात उघड होऊन मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
* यंत्राचे वाटप करणारे कर्मचारी की पक्ष कार्यकर्ते?
निवडणूक आचारसंहिता कालावधीत महिलांना फोन करून घरघंटी व शिलाई मशीन वाटप करणारे कर्मचारी की पक्ष कार्यकर्ते? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
* आचारसंहिततेचे उल्लंघन?
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दरम्यान महिलांना शिलाई मशीन व घरघंटी वाटप केले जात आहे. हा प्रकार आचारसंहितेचे उल्लंघन नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.
*यंत्र वाटपात महापालिकेचा सहभाग नाही...उपायुक्त सुभाष जाधव
महापालिका महिला व बालकल्याण विभागाने शिलाईमशीन व घरघंटीच्या पात्र महिलांची यादी प्रसिद्ध केली. निवडणूक आचारसंहितामुळे वाटप थांबविण्यात आल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगून बाहेरच्या प्रकाराशी महापालिकेचे काहीएक घेणेदेणे नसल्याचे सांगितले.