दिवाळीच्या फराळासाठी ठाण्यातील सहा लाख गरीबांना ‘आनंद शिधा’ वाटपाला प्रारंभ
By सुरेश लोखंडे | Published: October 20, 2022 05:41 PM2022-10-20T17:41:03+5:302022-10-20T17:41:23+5:30
शिधावाटप विभागाच्या फ परिमंळाचे उपनियंत्रक ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी या फराळ साहित्याचे केळकर यांच्या हस्ते आज वाटप करून या योजनेला जिल्ह्यात प्रारंभ केला आहे.
ठाणे : राज्य शासनाने घोषीत केलेल्या ‘आनंद शिधा’ या फराळ साहित्याचा वाटपाला येथील नौपाडा येथून आज सुरूवात झाली. आमदार संजय केळकर यांनी या साहित्याचे आज वाटप केले. आता हा शिधा जिल्ह्यातील सर्व सहा महापालिका, दोन नगर परिषदांच्या शहारांमध्ये पाच लाख १२ हजार अंत्योदय कार्डधारक व प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारकांना अवघ्या शंभर रूपयात पाच किलो साहित्य वाटप होणार आहे.
‘सात लाख कार्डधारक आनंद शिधाच्या प्रतिक्षेत’ या मथळ्याखाली लोकमतने १९ आॅक्टोबर रोजी वृत्त प्रसिध्द करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन शिधावाटप विभागाच्या फ परिमंळाचे उपनियंत्रक ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी या फराळ साहित्याचे केळकर यांच्या हस्ते आज वाटप करून या योजनेला जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. त्यामुळे आता १२ हजार ४८८ अंत्योदय कार्डधारकांसह पाच लाख ९९ हजार ८७५ प्राधान्यक्रमाच्या शिधापत्रिकाधारकांना हा आनंद शिधा वाटपाला प्रारंभ झाला आहे.
या फराळ साहित्या वाटपामुळे आता जिल्ह्यातील गरीबाच्या घरची दिवाळी गोड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्याभरातील तब्बल सहा लाख कार्डधारकांना या सहा लाख संचाचे वाटप अवघ्या शंभर रूपयात होणार आहे. या संचामध्ये एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, एक किलो रवा व एक लिटर पामतेल या वस्तूंचा समावेश आहे.
अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त फराळासाठी शिधावस्तूंचा संच अल्प दरात म्हणजेच शंभर रूपयात वाटप केले जात आहे. जिल्ह्याभरातील अधिकृत शिधावाटप दुकानांमधून दिवाळी कालावधीत हा साहित्याचे वितरीत करण्यात येत आहे. जे शिधापत्रिकाधारक सध्या बायोमेट्रिक पध्दतीने या शिघाजिन्नस प्राप्त करीत आहेत, त्यांना या ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा लाभ मिळणार आहे.