बीएसयूपी घरे वितरित करण्याचा मार्ग मोकळा; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 08:28 PM2022-05-23T20:28:52+5:302022-05-23T20:29:23+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून बांधून तयार असलेल्या तब्बल साडे तीन हजार घरांचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे.

distribution of BSUP houses Order of Urban Development Minister Eknath Shinde | बीएसयूपी घरे वितरित करण्याचा मार्ग मोकळा; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

बीएसयूपी घरे वितरित करण्याचा मार्ग मोकळा; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

Next

कल्याण: 

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून बांधून तयार असलेल्या तब्बल साडे तीन हजार घरांचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. बीएसयुपी योजनेअंतर्गत बांधलेली ही घरे तंत्रित अडचणींमुळे लाभार्थ्यांना दिली जात नव्हती. महापालिकेने राज्य शासनाला त्यासाठीचे पैसे बाजार भावानुसार अदा करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचविण्यात आला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर पालिकेने अदा करावे लागणारे पैसे माफ करण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच बीएसयूपी घरांचा प्रश्न निकाली निघणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बीएसयुपी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली सुमारे साडे तीन हजार घरे गेल्या काही वर्षांपासून पडून आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना घरे असूनही इतरत्र राहावे लागते आहे. योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर काही काळात ही योजना बंद झाली. यात केंद्र शासनाला अदा करावा लागणारा पालिकेचा हिस्सा माफ करून घेण्यात यापूर्वीच खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यश मिळवले. त्यानंतर या घरांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे राज्यशासनाला प्रति घरटी बाजारभावानुसार पैसे अदा करावे लागणार होते. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही घरे लाभार्थ्यांना मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार यापूर्वी सचिव स्तरावर एक बैठक पार पडली. मात्र म्हाडाच्या शासन निर्णयानुसार महापालिकेला बाजारभावानुसार राज्य शासनाला पैसे अदा करावे लागणार होते.  

सध्याच्या बाजारभावानुसार प्रति घरटी वीस लाख रुपये द्यावे लागणार होते. ही पालिकेच्या स्तरावर अशक्यप्राय गोष्ट असल्याने याबाबत सूट मिळावी या मागणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. शहरातील प्रकल्पग्रस्तांना वेळेत ही घरे मिळावी अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. सोमवारी मंत्रालयात यासंदर्भात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेकडून शासनाला द्यावे लागणारे पैसे माफ करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले. लवकरच याबाबत ना हरकत दाखला शासनाकडून मिळणार आहे. त्यानंतर ही घरे वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सुमारे साडेतीन हजार घरांचा प्रश्न निकाली निघाला आहे. 

लवकरच या घरांचे वाटप केले जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी,कल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Web Title: distribution of BSUP houses Order of Urban Development Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.