भिवंडीत आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे प्रमाणपत्राचे वितरण
By नितीन पंडित | Published: August 25, 2023 04:59 PM2023-08-25T16:59:07+5:302023-08-25T16:59:57+5:30
आदिवासी समाज बांधवांना वन जमिनीच्या पट्ट्यांचे वितरण होणे ही खऱ्या अर्थाने बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली ठरणार असून श्रमजीवी संघटनेने यासाठी निरंतर लढा उभारला.
भिवंडी: तालुक्यातील १२९ आदिवासी बांधवांना मंजूर झालेले वन हक्क पट्ट्यांचे वितरण शुक्रवारी आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी अमित सानप,तहसीलदार अधिक पाटील,नायब तहसीलदार चंद्रकांत राजपूत,श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर,उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी समाज बांधवांना वन जमिनीच्या पट्ट्यांचे वितरण होणे ही खऱ्या अर्थाने बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली ठरणार असून श्रमजीवी संघटनेने यासाठी निरंतर लढा उभारला आणि त्यामुळेच आज भिवंडी तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांना पट्ट्यांचे वितरण करण्यात आलेले आहे असे आपल्या प्रास्ताविकात श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सांगितले असून शासनाने आदिवासी समाज बांधवांना दिलेल्या या वन पट्ट्यांचा वापर करून लाभार्थ्यांनी स्वतःची उपजीविका त्या ठिकाणी करायची असून एकाही लाभार्थ्याने आपले जमिनीचे पट्टे विकत अथवा भाड्याने कोणाला देऊ नयेत असे कुठे आढळून आल्यास ते वनहक्क पट्टे रद्द करण्याची शिफारस श्रमजीवी संघटना शासनाला करेल असा इशारा देखील भोईर यांनी यावेळी आदिवासी बांधवांना दिला आहे.
तर हे वन पट्टे मिळवून देण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे.आता आपण या वन पट्ट्यात आधुनिक शेती तसेच भात शेती, नागली, भाजीपाला व जंगल लाकूड लागवड करून वनाचे खरे राखणदार आपण आहोत हे शासकीय यंत्रणेला दाखवून द्यावे असे आवाहन आमदार शांताराम मोरे यांनी केले.