उल्हासनगर महापालिकेच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीन व घरघंटीचे वाटप
By सदानंद नाईक | Published: November 1, 2023 07:15 PM2023-11-01T19:15:36+5:302023-11-01T19:20:53+5:30
यावेळी आयुक्त शेख यांनी महिलांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.
उल्हासनगर : गरीब व गरजू महिला रोजगार स्वयंपूर्ण होण्यासाठी महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ९२ महिलांना शिलाई मशीन व ३० महिलांना घरघंटी देण्यात आली. तसेच विभागाच्या वतीने महिलांना विविध प्रशिक्षणही दिले जात असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील महिला बचत गट तसेच गरीब व गरजू महिलांना महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. महिला स्वतःच्या पायावर उभे राहून घरसंसाराला हातभार लावण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शिलाई मशीन प्रशिक्षण, नर्सिंग कोर्स, ब्युटीपार्लर आदीचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच स्वतःचा लहान-मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी ९२ शिलाई मशीन व ३० घरघंटी गाड्याचे वाटप मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी आयुक्त शेख यांनी महिलांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला महापालिका अधिकारी, महिला बचत गटाच्या प्रमुख, महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख नितेश रंगारी आदीजन उपस्थित होते.