गणेशोत्सवासाठी ८५६ वाहनांना पथकर सवलतीच्या पासचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:48 AM2021-09-09T04:48:49+5:302021-09-09T04:48:49+5:30

ठाणे : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी व चाकरमान्यांची पथकरातून सुटका व्हावी, यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ...

Distribution of pass tax concession passes to 856 vehicles for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी ८५६ वाहनांना पथकर सवलतीच्या पासचे वितरण

गणेशोत्सवासाठी ८५६ वाहनांना पथकर सवलतीच्या पासचे वितरण

Next

ठाणे : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी व चाकरमान्यांची पथकरातून सुटका व्हावी, यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलतीचे आदेश दिले. त्यानुसार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने अवघ्या दोन दिवसांतच ७३० एसटी बसेससह ८५६ वाहनांना पथकर सवलतीचे पास वितरित केले. यामध्ये १२६ पास खासगी वाहनधारकांना दिल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिली.

कोकणातील भाविक गणेशोत्सवासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज, शेंद्रे तसेच कऱ्हाड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, रत्नागिरी-सावर्डे या मार्गे कोकणात जातात. या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याची घोषणा करीत, त्यांना तातडीने स्टिकर्स उपलब्ध करून देण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील मर्फी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान खिडकी क्रमांक १६ आणि १८ वर ऑफलाईन पद्धतीनेच ते मिळणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून टोल फ्री पास घेऊन जाण्याचे आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. त्यात पास वाटपाच्या पहिल्याच दिवशी, मंगळवारी परिवहन विभागाच्या कार्यालयातून १६० पासचे वितरण केले होते. यात १३० एसटी बसचा समावेश होता. ३० पासेस खासगी वाहनधारकांना दिले. दरम्यान, बुधवारी ६०० पास एसटी विभागाला मिळाले. खासगी वाहनधारकांना ९६ पास मिळाले. आतापर्यंत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने ८५६ पासचे वितरण केल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.

कोट -

आतापर्यंत ८५६ पासचे ठाण्यात वाटप झाले. यात ७३० एसटी बसचा समावेश आहे. नागरिकांसाठी हे पास सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ऑफलाईन पद्धतीने वितरित केले जाणार आहेत.

-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

Web Title: Distribution of pass tax concession passes to 856 vehicles for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.