कोकणातील गणेशोत्सवासाठी दोन दिवसातच ८५६ वाहनांना पथकर सवलतीच्या पासचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 11:16 PM2021-09-08T23:16:47+5:302021-09-08T23:23:24+5:30
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अवघ्या दोन दिवसातच ७३० एसटी बसेससह ८५६ वाहनांना पथकर सवलतीचे पास वितरीत केले. यामध्ये १२६ खासगी वाहनधारकांना पास दिल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी व चाकरमान्यांची पथकरातून सुटका व्हावी, यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलतीचे आदेश दिले. त्यानुसार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अवघ्या दोन दिवसातच ७३० एसटी बसेससह ८५६ वाहनांना पथकर सवलतीचे पास वितरीत केले. यामध्ये १२६ खासगी वाहनधारकांना पास दिल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिली.
कोकणातील भाविक गणेशोत्सवासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुर्इंज,शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, रत्नागिरी-सावर्डे या मार्गे कोकणात जातात. त्यामुळेच या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याची घोषणा करीत, त्यांना तातडीने स्टीकर्स उपलब्ध करु न देण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील आणि विश्वंभर शिंदे यांनी ठाण्यातील मर्फी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयातून या पासच्या वितरणाचे नियोजन केले. त्यानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान खिडकी क्रमांक १६ आणि १८ वर आॅफलाईन पद्धतीने हे पास वितरीत केले जात आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून टोल फ्री पास घेऊन जाण्याचे आवाहन ठाणे आरटीओ कार्यालयाने केले आहे. पास वाटपाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी परिवहन विभागाच्या कार्यालयातून १६० पासचे वितरण करण्यात आले. यामध्ये १३० एसटी बसेसचा समावेश होता. तर ३० पासेस खासगी वाहनधारकांना दिले. दरम्यान, बुधवारी ६०० पासेस एसटी विभागाला मिळाले. खासगी वाहन धारकांना ९६ पासचे वितरण झाले. आतापर्यंत ठाणे आरटीओ कार्यालयाने ८५६ पासेसचे वितरण केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘पहिल्या दिवशी १६० पासचे तर दुसºया दिवशी ६९६ अशा ८५६ पासचे ठाण्यात आतापर्यंत वितरण करण्यात आले. यात ७३० एसटी बसेसचा समावेश आहे. नागरिकांसाठी हे पास सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान आॅफलाईन पध्दतीने वितरीत केले जाणार आहेत. ’’
जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे.