चुकीच्या बिलांवरून पाणीपुरवठा अन मालमत्ता विभागात जुंपली
By admin | Published: October 28, 2016 03:36 AM2016-10-28T03:36:12+5:302016-10-28T03:36:12+5:30
नऊ प्रभाग समित्यांमधील नागरिकांना पाण्याची बिले चुकीच्या पद्धतीने दिली जात असल्याचा मुद्दा गुरुवारच्या महासभेत गाजल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने अशा बिलांची
ठाणे : नऊ प्रभाग समित्यांमधील नागरिकांना पाण्याची बिले चुकीच्या पद्धतीने दिली जात असल्याचा मुद्दा गुरुवारच्या महासभेत गाजल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने अशा बिलांची शोधमोहीम सुरू करून त्यात दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु, यानिमित्ताने आता पाणीपुरवठा आणि मालमत्ताकर विभाग यांच्यात चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. मालमत्ताकर विभागाने ही चूक पाणीपुरवठा विभागाची असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, दुसरीकडे पाणीपुरवठा विभागाने मात्र मालमत्ताकर विभागाने ज्या एजन्सीला इमारतींच्या सर्व्हेचे काम दिले होते, त्यांनी ते चुकीच्या पद्धतीने केल्यानेच चुकीची बिले गेल्याचा ठपका ठेवला आहे.
गुरुवारच्या महासभेत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने १० प्रभाग समित्यांमधील बहुसंख्य नागरिकांना चुकीच्या पद्धतीने पाणीबिले येत असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महापौरांनी पूर्वीच्याच पद्धतीने बिले अदा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर, आता १० प्रभाग समितीअंतर्गत सुमारे तीन ते चार हजार रहिवाशांना अशा पद्धतीने चुकीची बिले दिल्याची कबुली पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. परंतु, ही चूक आमची नसून मालमत्ताकर विभागाने नेमलेल्या आणि ज्यांनी इमारतींमधील फ्लॅटचा सर्व्हे केला, त्या एजन्सीची असल्याचा दावा केला आहे. त्यांनीच चुकीच्या पद्धतीने सर्व्हे केल्याने आमच्या विभागाकडून त्यानुसारच ती गेल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांचे जुने कोणतेही रेकॉर्डही मालमत्ताकर विभागाकडे उपलब्ध नसल्याने थकबाकी वसूल करतानादेखील अडचणी येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात मालमत्ताकर विभागाशी संपर्क साधला असता आम्ही कोणत्याही प्रकारे चुकीचा सर्व्हे केला नसल्याचा दावा केला आहे. उलट, आम्ही जो डेटा तयार केला होता, त्याची संपूर्ण माहिती पाणीपुरवठा विभागाला दिली आहे. त्यामुळे चूक आमची नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)