जिल्ह्यात हेल्थवर्कर १०४ तर फ्रंटलाइन वर्करचे १४३ टक्के झाले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:24 AM2021-07-22T04:24:58+5:302021-07-22T04:24:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एकीकडे तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाच दुसरीकडे तिचा सामना करण्यासाठी हेल्थवर्कर आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकीकडे तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाच दुसरीकडे तिचा सामना करण्यासाठी हेल्थवर्कर आणि फ्रंटलाइन वर्कर यांचे १०० टक्के लसीकरण होणे अपेक्षित आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात एकूण हेल्थ वर्करपैकी पहिल्या डोसचे १०४ टक्के लक्ष्य पूर्ण झाले आहे. तर, फ्रंटलाइन वर्करचे पहिल्या डोसचे १४३ टक्के लक्ष्य पार झाले आहे. मात्र, उल्हासनगरमधील ७३ टक्के, भिवंडीत ४७ टक्के आणि ठाणे महापालिका हद्दीत ७५ टक्के हेल्थ वर्करचे पहिले डोस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी ही यंत्रणादेखील आता सज्ज असल्याचेच दिसत आहे.
येत्या महिनाभरात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने कोरोनाला हरवायचे असेल किंवा रोखायचे असेल, तर लसीकरण हे महत्त्वाचे आहे. परंतु, लसींचा पुरेसा साठा येत नसल्याने आजही लसीकरण मोहिमेला वेग आलेला नाही. असे असले तरीदेखील जानेवारी ते आतापर्यंत जिल्ह्यात ३१ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये १६ लाख ७९ हजार ४५७ जणांना पहिला डोस, तर ५ लाख ९६ हजार ६८४ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत २२ लाख ७६ हजार १४१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाइन वर्करची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांचे १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात त्यांचे लसीकरण तेजीत झाले आहे. एक लाख दोन हजार ३३७ हेल्थ वर्करपैकी एक लाख सहा हजार तीन जणांना म्हणजेच लक्ष्याच्या १०४ टक्के लसीकरण करून पहिला डोस देण्यात आला आहे. तर, ६० टक्के हेल्थ वर्करला दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यानुसार, ६१ हजार ३८३ जणांना दुसरा डोस दिला आहे. दुसरीकडे फ्रंटलाइन वर्करचे ८२ हजार ९२० लक्ष्य असताना एक लाख १८ हजार २१२ जणांना कोरोनाचा पहिला डोस दिला आहे. याचाच अर्थ लक्ष्यापेक्षा १४३ टक्के लसीकरण झाले आहे. तर, दुसरा डोस ५२ हजार ६१० जणांना दिला असून हे लक्ष्य ६३ टक्के पूर्ण झाले आहे.
.............
तीन महापालिका क्षेत्रांतील हेल्थवर्कर मागे
जिल्ह्यातील सहा महापालिका आणि ग्रामीण भाग मिळून हे लक्ष्य पार केले असले, तरी उल्हासनगर, भिवंडी आणि ठाण्यात अद्यापही हेल्थवर्करचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण झालेला नाही. मात्र, फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण जवळजवळ १०० टक्के पूर्ण झाले आहे.
..................
एकूण हेल्थ केअर वर्कर्स - १,०२,३३७
पहिला डोस किती जणांनी घेतला - १,०६,००३
दुसरा डोस घेणारे - १.६७,३८६
फ्रंटलाइन वर्कर - ८२,९२०
पहिला डोस किती जणांनी घेतला - १,१८,२१२
दुसरा डोस घेणारे - ५२,६१०
लसीकरणाबाबत उदासीनता नाही
ठाणे जिल्ह्यात कुठेही हेल्थवर्कर किंवा फ्रंटलाइन वर्करमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता दिसून आलेली नाही. किंबहुना, जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आताही हेल्थवर्कर किंवा फ्रंटलाइन वर्कर शिल्लक राहिले असतील, तर त्यांचा शोध घेऊन त्यांना लस दिली जात आहे. किंबहुना, ठाणे जिल्ह्यात लक्ष्यापेक्षा अधिकचे लसीकरण झालेले आहे.
.........
तिसऱ्या लाटेचा धोका संभवत असला, तरी आमची जिल्हा यंत्रणा त्यासाठी सज्ज ठेवली आहे. ऑक्सिजन बेड, लहान मुलांसाठी आवश्यक बेड, औषधांचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. त्यातही कोरोनामध्ये हेल्थवर्कर आणि फ्रंटलाइन वर्करची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांचे १०० टक्के लसीकरण करून घेतले जात आहे. ज्यांचा दुसरा डोस शिल्लक असेल, त्यांना तो देण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून पुढाकार घेऊन तोदेखील दिला जात आहे.
(कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे )