जिल्ह्यात ३,४९४ बालकांनी आरटीई प्रवेश नाकारले, शिक्षण विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 09:52 AM2020-10-19T09:52:37+5:302020-10-19T10:02:30+5:30
यंदा ६६९ शाळांमध्ये ‘आरटीई’खाली प्रवेश दिले गेले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सीनिअर केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेनंतर प्रतीक्षायादीतील १,८९४ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.
ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली दुर्बल घटक आणि मागासवर्गीय परिवारांतील बालकांना त्यांच्या जवळच्या शाळेत २५ टक्के शालेय प्रवेश मोफत दिले जात आहेत. यानुसार, जिल्ह्यातील ९,३२६ मुलांची लॉटरी सोडतद्वारे निवड झाली. यापैकी ५,६७७ जणांचे प्रवेश झाले असून १५२ जणांना विविध कारणांखाली प्रवेश नाकारले आहेत. उर्वरित ३,४९४ बालकांच्या प्रवेशासाठी आईवडील शाळेत गेले नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रवेश नाकारल्याचे उघड झाले आहे.
यंदा ६६९ शाळांमध्ये ‘आरटीई’खाली प्रवेश दिले गेले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सीनिअर केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेनंतर प्रतीक्षायादीतील १,८९४ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. मात्र, यातील १३४ जणांनीच प्रवेश घेतले आहेत. तर, १,७५८ बालकांचे पालक प्रवेशासाठी शाळेत गेलेले नाहीत. उर्वरित बालकांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पण, लाॅकडाऊनमुळे प्रवेश रखडले होते. यामुळे निवड प्रक्रियेची वाट न बघता पालकांनी त्यांच्या परिने या शाळांमध्ये प्रवेश घेतले. मात्र, अनेक पालकांना विविध समस्या, शाळांकडून मार्गदर्शन न झाल्यामुळे मुलांचे प्रवेश घेता आलेले नाहीत.
आजपर्यंत १३४ जणांना प्रवेश मिळाले आहेत. उर्वरित निवड झालेल्या १,७९२ मुलांचे पालक मार्गदर्शनाअभावी गोंधळलेले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रवेश रखडले आहेत. यासाठी जूनमध्ये सोडतीद्वारे निवड झालेली आहे. प्रवेशाची शाळा प्रशासनाने एसएमएसद्वारे पालकांना कळवली आहे.
तक्रार क्रमांक 1-
प्रवेश नाकारलेल्या बालकांच्या पालकांकडे उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे काही बालकांचे प्रवेश नाकारले आहेत.
तक्रार क्रमांक 2 -
जातीचा दाखला नसल्यामुळेही प्रवेश नाकारले. परराज्यांतील जातीचे दाखले असल्याच्या कारणाखालीही प्रवेश दिला नाही.
२३ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घ्या -
प्रतीक्षायादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश २३ तारखेपर्यंत दिलेल्या शाळेत पालकांनी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्ससह अलॉटमेंट लेटरची प्रत सोबत न्यावी. पालकांनी मुलांना शाळेत घेऊन जाऊ नये.
- समिना शेख, शिक्षणाधिकारी (प्र.), जि.प. ठाणे