आरटीईच्या १३ हजार जागांसाठी जिल्ह्यातून २०,६६७ ऑनलाइन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 11:59 PM2020-03-08T23:59:45+5:302020-03-09T00:00:08+5:30
शिक्षण विभागाची माहिती : आता सोडतीची अपेक्षा
सुरेश लोखंडे
ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यानुसार जिल्ह्यातील समाजामधील एससी, एसटी, वंचित आणि दुर्बल घटक प्रवर्गातील बालकांना पहिली ते केजीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी १२ हजार ९१३ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातील ६६९ शाळांमधील प्रवेशांपैकी रिक्त ठेवलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी बुधवारी शेवटच्या मुदतीपर्यंत २० हजार ६६७ आॅनलाइन अर्ज जिल्हाभरातून प्राप्त झाले. त्यातून या आठवड्यात लॉटरी सोडतीद्वारे अपेक्षित शाळांमध्ये प्रवेश निश्चित होण्याची अपेक्षा आहे.
१२ हजार ९१३ राखीव जागांवरील शालेय प्रवेशासाठी ६६९ शाळांची निवड केली आहे. यामध्ये पहिलीच्या वर्गात ११ हजार ५७४ बालकांना प्रवेश मिळणार आहे. पूर्वप्राथमिकसाठी एक हजार ३३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
अंबरनाथ तालुक्यामधून एक हजार ९९५ अर्ज, भिवंडी-१ ला दोन हजार १९७, भिवंडीला ६३८, कल्याणला एक हजार ८८७, कल्याण-डोंबिवलीला दोन हजार २६६, मीरा-भार्इंदरला १६१, मुरबाडला ६२, ठाणे मनपा क्षेत्रात एक हजार ३४३, ठाणे मनपा २ मध्ये तीन हजार १४३ आणि उल्हासनगर शहरातून एक हजार ६३, नवी मुंबई पाच हजार ३००, तर शहापूरमधून ५९२ आॅनलाइन अर्ज प्रवेशासाठी आले आहेत.
एकूण प्रवेशासाठी वंचित घटकातील प्रवर्गास, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली बालके, दुर्बल घटक एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले सर्व घटक, विधवा, घटस्फोटित महिलांची बालके, अनाथ बालक, एकाकी पालकांची बालके आदीना आॅनलाइन अर्ज दाखल करता येतो.
शिक्षण हक्क कायद्यान्वये ठाणे जिल्ह्यात एकूण १२ हजार ९१३ जागा राखीव आहेत. या जागांच्या प्रवेशासाठी यंदाही लॉटरी सोडतद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. यंदा सात हजार ७५४ ऑनलाइन अर्ज जास्त आले आहेत.