भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 07:17 PM2020-06-02T19:17:51+5:302020-06-02T19:18:15+5:30

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 2 ते 4 जून दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्यांमध्ये धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे.  

District Collector directs to move fishermen living in bhayander sea shore to a safe place on | भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Next

मीरारोड: निसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमारांना खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफचे पथक तैनात असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज मंगळवारी तर आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सोमवारी सायंकाळी या परिसराची पाहणी केली. 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 2 ते 4 जून दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्यांमध्ये धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे.  

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी किनारा परिसराची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख, उपअधीक्षक डॉ शशिकांत भोसले, सहाय्यक निरीक्षक एस. डी. निकम, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, स्थानिक नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला गंडोली, एलायस बांड्यासह मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. 

यावेळी किनाऱ्यालगतच्या पहिल्या दोन रांगेतील घरे तसेच तिसऱ्या रांगेतील तळ मजल्यावर राहणाऱ्यांना खबरदारी म्हणून हलवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. वेलंकनी तीर्थ मंदिर आणि संत जोसेफ शाळेत त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. किंवा मच्छीमारांनी आपल्या नातलगां कडे  थांबावे. एनडीआरएफचे 23 जणांचे पथक या भागासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय तटरक्षक दल, पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

हलवण्यात येणाऱ्या मच्छीमार नागरिकांची व्यवस्था पालिका करणार असून अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथक तैनात केले आहे. चक्रीवादळ आल्यास कोणत्या अधिकाऱ्याने काय काम करायचे याची जबाबदारी आयुक्त डांगे यांनी आदेश काढून नेमून दिली आहे. 

किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले जात असले तरी त्यांची समजूत काढण्याची आवश्यकता असल्याने पोलीस, मच्छीमार संस्था प्रतिनिधी, गाव जमात, नगरसेवक आदींनी याकामी पुढाकार घेण्यास सांगण्यात आले आहे. 

समुद्रातील बहुतांश बोटी किनाऱ्यावर परतल्या असून उत्तन व चौकच्या प्रत्येकी 4 तर भाटे बंदराच्या 3 अशा 11 मच्छीमार बोटी परतीच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. किनाऱ्यावरील बोटी सुरक्षित स्थळी ठेवण्याच्या सूचना मच्छिमारांना देण्यात आल्या आहेत. 

Web Title: District Collector directs to move fishermen living in bhayander sea shore to a safe place on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.