जिल्हा इमर्जन्सी कंट्रोल सेंटर मृत्युशय्येवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:04 AM2018-05-26T03:04:33+5:302018-05-26T03:04:33+5:30
दोन वर्षांपासून या सेंटरची पकड कमी झाल्यामुळे स्फोटांसह कंपन्यांच्या आगीत वाढ झाली आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांत स्फोट व आगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षात सुमारे आठ वर्षांपूर्वी ‘इमर्जन्सी कंट्रोल सेंटर’ सुरू केले. दोन वर्षांपासून या सेंटरची पकड कमी झाल्यामुळे स्फोटांसह कंपन्यांच्या आगीत वाढ झाली आहे. यामुळे औटघटका मोजत असलेले हे इमर्जन्सी सेंटर सक्रिय करण्याची गरज आहे.
हे सेंटर ठाणे मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (टीएमए) या संस्थेद्वारे चालवण्यात येत आहे. रासायनिक प्रक्रिया करणाºया कंपन्यांना या कंट्रोल सेंटरचे सभासद करून त्यातील रासायनिक स्फोट व आगप्रतिबंधक उपाययोजनांवर सतत लक्ष केंद्रित करून त्यातील संभाव्य धोके टाळणारे मार्गदर्शन केले जाते. प्रारंभी १३ मोठ्या कंपन्या या कंट्रोल रूमशी संलग्न होत्या. परंतु, त्यांना वेळेत सेवा न मिळाल्याने त्या दुरावल्या. जिल्हाधिकाºयांनी वेळीच लक्ष देऊन हे सेंटर सक्रिय करण्याची गरज आहे. यामुळे कंपन्यांच्या मनमानीला आळा बसून विनापरवाना रासायनिक प्रक्रियांवरही वचक बसेल.
आठ महिन्यांत ४८ मृत्यू
गेल्या आठ महिन्यांत ८३ दुर्घटनांत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. १५ दिवसांपूर्वी भिवंडी, बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी कंपन्या, गोडाउनमध्ये आगीच्या घटना घडल्या. भिवंडी तालुक्यातील कशेळी, गुंदवली, दापोडे, दिवे आदी महामार्गांलगतच्या गावांजवळ अनधिकृत १९३ गोडाउनमध्ये रासायनिक विस्फोटकांचा साठा होतो. यातील १८९ गोडाउनकडे परवानगीच नाही.