जिल्ह्याला मिळाला कोविशिल्डचा १ लाखाचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:41 AM2021-04-27T04:41:21+5:302021-04-27T04:41:21+5:30
ठाणे : मागील काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात ठाणे जिल्ह्याला लसींचा साठा मिळत आहे. परंतु रविवारी उशिरा ठाणे जिल्ह्याला ...
ठाणे : मागील काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात ठाणे जिल्ह्याला लसींचा साठा मिळत आहे. परंतु रविवारी उशिरा ठाणे जिल्ह्याला पुन्हा १ लाख कोविशिल्डचे, तर ४ हजार ९० डोस कोव्हॅक्सिनचे मिळाले आहेत. त्यानुसार सोमवारी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी लसीकरण मोहिमेला वेग आल्याचे दिसून आले. यामध्ये ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीला अधिकचा साठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, ठाण्यात सोमवारी ५६ पैकी ३७ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू होती.
एकीकडे ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परंतु दुसरीकडे लस उपलब्ध होताना दिसत नाही. मागील आठवडाभर लस कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्याला उपलब्ध होत होत्या. परंतु आता संपूर्ण जिल्ह्यासाठी पुन्हा १ लाखाच्या वर साठा उपलब्ध झाला आहे. लस नसल्याने रविवारी ठाण्यासह जिल्ह्याच्या इतर भागांत लसीकरण बंद होते. लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरू करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार रविवारी सायंकाळी जिल्ह्याला हा लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सोमवारी ठाणे महापालिकेने ३७ केंद्रांवर लसीकरणाची मोहीम सुरू केली. ठाण्यात ५६ लसीकरण केंद्रे आहेत. परंतु लसींचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने सोमवारी महापालिकेच्या माध्यमातून ३७ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. महापालिकेच्या माध्यमातून सोमवारी कोविशिल्डचे पहिला आणि दुसरा डोस दिला जात होता. परंतु कोव्हॅक्सिनचा साठा तुरळक आल्याने दुसराच डोस दिला जात होता. ज्यांच्याकडे पहिला डोस घेतल्याचे सर्टिफिकेट असेल अशांनाच कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात होता. परंतु लस कमी-अधिक प्रमाणात येत असल्याने लस घेण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक केंद्रावर गर्दी दिसून येत होती.
जिल्हानिहाय आलेला लसींचा साठा
कोविशिल्ड कोव्हॅक्सिन
ठाणे - २४००० - १०००
कल्याण-डोंबिवली - १२००० - १०००
मीरा-भाईंदर - १६००० - १०००
नवी मुंबई - २७००० - १०००
ठाणे ग्रामीण - १५००० - ९०
उल्हासनगर - ४००० - ००
भिवंडी - २००० - ००
----------------------
एकूण - १००००० - ४०९०