जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांवरील उपचारांसह शस्त्रक्रियाही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:43+5:302021-07-11T04:26:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यातील शासकीय रुग्णांलय असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना काळातही महत्त्वाच्या छोट्यामोठ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यातील शासकीय रुग्णांलय असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना काळातही महत्त्वाच्या छोट्यामोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यातही कोरोनाबाधित गरोदर महिलांच्या सीझर शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या मोठ्या शस्त्रक्रियादेखील सुरू आहेत. मात्र, अद्यापही ओपीडी सुरू झालेली नाही. परंतु, आता दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय इतर छोट्यामोठ्या शस्त्रक्रिया सुरू असून ओपीडी बंद असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविले जात आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने ठाणे जिल्ह्यात दस्तक दिल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. आजघडीला येथे ३००च्या आसपास बेड असून त्या ठिकाणी ५५ कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २४५ बेड सध्या रिकामे आहेत. कोविड रुग्णालय झाल्यानंतर येथील केवळ अपघाताच्या शस्त्रक्रिया बंद पडलेल्या आहेत. अशा रुग्णांना कळवा रुग्णालयात पाठविले जाते. परंतु, इतर सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया येथे सुरू आहेत. स्त्रियांची प्रसूती शस्त्रक्रियादेखील येथे होत आहे, सोनोग्राफीची मशीनदेखील सुरू असून रोजच्या रोज ८ ते १० जणांची सोनोग्राफी केली जात आहे. त्यातही या ठिकाणी महागडी सिटीस्कॅन मशीनचाही पुरेपूर वापर रोजच्या रोज होत आहे. या मशीनद्वारे रोज सरासरी ६ ते ७ जणांचे स्कॅन केले जात आहे. याशिवाय मागील वर्षभरात येथे डोळ्यांच्यादेखील २००च्या आसपास शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. याशिवाय लेप्रोकोसिसचे मशीनदेखील उपलब्ध असून त्या माध्यमातून रुग्णांवर टाकेविरहित शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. बायपॅक मशीन, हाय फ्लो नजेल ऑक्सिजन, एक्सरे, फेको, पोस्टमार्टमदेखील केले जात आहे. कोरोना काळातही कोणत्याही शस्त्रक्रिया थांबल्याचे दिसून आलेले नाही.
अपघात शस्त्रक्रिया आणि ओपीडी अद्यापही येथे सुरू केलेले नाही. अशा रुग्णांना महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविले जात आहे. महापालिकेच्या कळवा रुग्णालयात सध्या सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे या रुग्णालयावरील ताण वाढला आहे.
जिल्हा रुग्णालयातील ओपीडी बंदच
जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय असल्याने अद्यापही येथील ओपीडी सुरू केलेली नाही. या रुग्णालयात ठाण्यासह पालघर जिल्ह्यातूनही शेकडो नागरिक उपचारांसाठी येत असतात. परंतु, कोरोना असल्याने आणि त्यात हे रुग्णालय कोविड रुग्णालय असल्याने त्याचा फटका येथे ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांना बसू नये म्हणूनच अद्यापही ओपीडी सुरू केलेली नाही.
गरिबांवर कोरोनाशिवाय इतर उपचार झाले कोठे?
जिल्हा शासकीय रुग्णालयात अपघात वगळता, डोळ्यांच्या छोट्यामोठ्या शस्त्रक्रियांसह सीझरच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. तर कळवा रुग्णालयात अपघातासह इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. कान, नाक, घसा, अपघात, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, अपेंडिक्स, हर्णिया आदी महत्त्वाच्या शस्त्रक्रिया कळवा रुग्णालयात होत आहेत. या ठिकाणी पालघर, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यातून रुग्ण येत असतात. ओपीडीवर रोजच्या रोज १५०० रुग्ण येथे आहेत. सध्या येथे टोटल बेड ५०० असून ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे या रुग्णालयावरील ताण वाढला आहे.
..........
जिल्हा शासकीय रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रूपांतर झाल्याने या ठिकाणी अपघाताच्या शस्त्रक्रिया वगळता कोविड रुग्णांवर आवश्यक असलेल्या इतर शस्त्रक्रिया आजही सुरू आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने डोळ्यांच्या शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. कोविडबाधित गरोदर महिलांवरदेखील सीझरिंगच्या शस्त्रक्रिया सुरू आहेत.
- कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे