डायलेसिस रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय ठरतेय आधार; कोरोनामुक्तीनंतरही उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:48 AM2020-05-28T00:48:55+5:302020-05-28T00:49:06+5:30
दोन युनिट कार्यरत; सात रुग्णांना मिळाला दिलासा
- पंकज रोडेकर
ठाणे : कोरोनामुक्तीनंतरही सात डायलेसिस रुग्ण ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ येत आहेत. त्यामुळे या रुग्णांसह कोरोना रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय हक्काचे आधार केंद्र ठरत आहेत.जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय झाल्यावर शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात पॉझिटिव्ह गरोदर महिला, नवजात शिशुंसाठी आणि डायलेसिस रुग्णांसाठी विशेष व्यवस्था केली गेली.
आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह म्हणून दाखल झालेल्या ११ जणांवर डायलेसिस केले, त्यामधील ७ जणांनी कोरोनाला हरवले आहे. तर चौघे अद्याप ही पॉझिटिव्ह असल्याने उपचार घेत आहेत.या अकरांमध्ये सात पुरुष तर ४ स्त्री रुग्णांचा समावेश असून दोघे हे ५० च्या आतील आहेत तर उर्वरित ९ जण हे ५० च्या वरील वयोगटातील आहेत.
हे रुग्ण जिल्ह्यातील असून त्यामध्ये ठामपामधील ६, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी असे प्रत्येकी दोन तसेच एक रुग्ण हा कल्याण-डोंबिवली येथील असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. त्यांच्यासाठी जिल्हा रुग्णालयात डायलेसिसचे दोन युनिट तयार केले आहेत. त्या युनिटमध्ये जिल्हा रुग्णालयातील फिजिशियन डॉ. नेताजी मुळीक, डॉ. सुजित शिंदे, संजना मुळीक यांचे पथक त्या रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुक्त रुग्णांना विशेष प्रमाणपत्र
कोरोनाला हरवून मुक्त झालेल्या त्या सात डायलेसिसच्या रुणांना जिल्हा रुग्णालयाकडून विशेष प्रमाणपत्र दिले गेले आहे. तरीदेखील त्या रुग्णांना डायलेसिससाठी जिल्ह्यातील कोणतेही रुग्णालयात सुरुवातीला घेत नव्हते. त्यामुळे त्या कोरोनामुक्त रुग्णांवर पुन्हा जिल्हा रुग्णालयात डायलेसिससाठी येण्याची वेळ ओढवली. तेथे उपचार करताना त्यांना विशेष सुरक्षिततेत त्या विभागात नेले जात असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात डायलेसिसचे उपचार केले जात आहेत. पण, त्या रुग्णांनी कोरोनाला हरवल्यानंतर त्यांना कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तरीसुद्धा त्यांना डायलेसिसचे उपचार इतर ठिकाणी मिळत नसल्याने त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधल्यावर त्यांच्यावर कोरोनामुक्तीनंतर सुरक्षिततेत डायलेसिस केले जात आहे.
- डॉ. कैलाश पवार, शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय ठाणे