जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 01:57 AM2019-12-28T01:57:05+5:302019-12-28T01:57:13+5:30
१३ पदे रिक्त : रुग्णांची हेळसांड, पदे त्वरित भरण्याची जनतेकडून जोरदार मागणी
ठाणे : जिल्हा सामान्य (सिव्हील) रुग्णालयात क्लास-१ डॉक्टरांची संख्या अवघी सहाच असल्याने उर्वरित मंजूर पदांपैकी १३ पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची वानवा असल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.क्लास-२ डॉक्टरांपैकी नऊ डॉक्टर हे गेल्या काही महिन्यांपासून गैरहजर असून त्यांच्या जागी कंत्राटी डॉक्टर भरल्यानंतरही दोन जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यातच, क्लास-१ डॉक्टरांची संख्या कमी असल्याने क्लास-२ वरील डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्याचे रुग्णालय म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाहिले जाते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह पालघर या जिल्ह्यातील ग्रामीण भागातून रुग्ण अजूनही उपचारार्थ येत आहेत. यामुळे ताप, सर्दी असो, विंचू किंवा सर्पदंश असो तसेच प्रसूती असो, यासाठी गोरगरीब रुग्णांची येथे नेहमीच गर्दी पाहण्यास मिळते. त्यातच, रुग्णालयाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. तसेच हे रुग्णालय सुपरस्पेशालिटी होत असल्याने तूर्तास तेथील विभाग स्थलांतरित केले जात आहेत.
या रुग्णालयात क्लास-१ डॉक्टरांची १९, तर क्लास-२ ची ३३ पदे मंजूर आहेत. क्लास-१ डॉक्टरांची सद्य:स्थितीत सहा पदे भरली आहेत. यापैकी एक डॉक्टर नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांची जागाही रिक्त झाल्याने पाच डॉक्टर कार्यान्वित आहेत. त्यामुळे जवळपास १४ पदे रिक्त राहिल्यानेही क्लास-१ डॉक्टर मिळत नसल्याची बोंब आहे. त्यातच क्लास-२ च्या डॉक्टरांची सद्य:स्थितीत सर्वच मंजूर असलेली ३३ पदे भरलेली दिसत आहेत. पण, त्यातील नऊ डॉक्टर गैरहजर असल्याचे दाखवून सर्व पदे भरल्याचे सांगण्यात आले. मध्यंतरी जिल्हाधिकारी आणि शल्यचिकित्सक यांच्या मान्यतेनुसार या नऊपैकी सात पदे कंत्राटी पद्धतीने भरली आहेत. पण, दोन पदे रिक्त आहेत. ती लवकरच भरली जाणार आहेत.
क्लास-१ डॉक्टरांनी पदे रिक्त असल्याच्या वृत्तास दुजोरा देऊन क्लास-२ वरील डॉक्टरांची पदे रिक्त नाहीत. मध्यंतरी, काही डॉक्टर गैरहजर होते. त्यांच्या जागी कंत्राटी पद्धतीने ती पदे भरली आहेत. तसेच या पदांसाठी मुलाखतीही लवकरच होणार आहेत.
- डॉ. कैलाश पवार,
जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे