जिल्हा रुग्णालय? नव्हे, हे तर असुविधांचेच आगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 03:43 AM2017-09-18T03:43:24+5:302017-09-18T03:43:41+5:30
जिल्हा सरकारी रुग्णालयात नवजात बाळांसाठी आवश्यक असलेल्या विशेष उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधाच नसल्याने आणि इन्क्युबेटरची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने ४७ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. याची दखल थेट आरोग्यमंत्र्यांनी घेतली.
- अजित मांडके
जिल्हा सरकारी रुग्णालयात नवजात बाळांसाठी आवश्यक असलेल्या विशेष उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधाच नसल्याने आणि इन्क्युबेटरची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने ४७ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. याची दखल थेट आरोग्यमंत्र्यांनी घेतली. परंतु, या ठिकाणी केवळ हीच सुविधा नसून अनेक असुविधांचा डोंगर रुग्णालयापुढे उभा राहिला आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा दावा जरी केला जात असला, तरी सध्याच्या घडीला असलेली इमारत ही धोकादायक तर झालीच आहे, शिवाय डॉक्टरांसह कर्मचारी, सफाई कामगार, रुग्णांना मिळत असलेल्या सुविधांचीही वानवा असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाºया रुग्णांच्या नातेवाइकांनाही वेटिंग रूम नसल्याने रुग्णालयाच्या आवारात कशाही पद्धतीने ते राहतात. सीटी स्कॅन मशीन नादुरुस्त, एक्स रे मशीन आहे, परंतु डिजिटल यंत्रणा उपलब्ध नाही, अपुºया प्रमाणात असलेले बेड आदींसह इतर असुविधांचाच पाढा वाचला, तरी तो कमी पडणार असल्याचे विदारक चित्र आहे.
ठाणे जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या उपचारासाठी नवजात शिशू विशेष उपचार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु, या ठिकाणी व्हेंटिलेटरच नसून इन्क्युबेटरची संख्याही पुरेशा प्रमाणात नाही. परंतु, असे असले तरीही यंत्रणा सध्याच्या घडीला पुरेशी असल्याचे मत रुग्णालय प्रशासन व्यक्त करत आहे. या घटनेनंतर आता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसह पालकमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. परंतु, केवळ दखल घेऊन उपयोग होणार नाही, तर ज्या सुविधांची वानवा आहे, त्या उपलब्ध करून देण्यासाठी या राजकीय मंडळींनीही चोख पावले उचलणे अपेक्षित असल्याचे मत आता व्यक्त होत आहे. जिल्हा रुग्णालय अर्थात विठ्ठल सायन्ना जिल्हा रुग्णालय अशी या रुग्णालयाची ओळख आहे. या ठिकाणी तीन इमारती आहेत. एक इमारत ही अपघात विभागाची असून दुसºया इमारतीमध्ये विविध प्रकारच्या ओपीडीची कामे होतात. तिसºया इमारतीतही ओपीडी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालय आहे. या रुग्णालयात आजच्या घडीला ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आदींसह पालघर जिल्ह्यातूनही गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. रोज ओपीडीत येणाºया रुग्णांची संख्या एक हजारांहून अधिकच आहे. परंतु, एखादा केसपेपर काढून तपासणी करेपर्यंत आणि औषधे घेईपर्यंत रुग्णाचा अर्ध्याहून अधिक दिवस जातो. त्यातही त्याला प्रत्येक ठिकाणी रुग्णालयातील दुर्गंधीचा सामना करावा लागतो. इमारतीमधील प्रत्येक मजला, जिन्यावर पानाच्या पिचकाºया येणारे रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकांकडून मारल्या जातात.
स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. काही विभाग थोड्याफार प्रमाणात का होईना हायटेक करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, उर्वरित विभागांची अवस्था न बघितलेलीच बरी. रुग्णांना बसण्यासाठी व्यवस्थित बाकडे नसणे किंवा त्यांची संख्या अपुरी असणे, या असुविधेबरोबरच डॉक्टरांसाठी फार अशा काही सुविधा आहेत, हा देखील भाग नाही.
>आजार परवडला, उपचार नको
गरीब कुटुंबातील व्यक्ती आजारी पडली की, तिला नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आणतात. येथे चांगले उपचार केले जातील, अशी त्यांची माफक अपेक्षा असते. मात्र, येथे आल्यावर रुग्णालयाची परिस्थिती पाहता आजार परवडला, उपचार नको, अशी म्हणण्याची वेळ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांवर येते.