लसीकरणासाठी मराठी अभिनेत्यांची जिल्हा रुग्णालयाला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:39 AM2021-04-06T04:39:52+5:302021-04-06T04:39:52+5:30
ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय कोविडच्या काळात सर्वसामान्य रुग्णांसह मराठी अभिनेते, शासकीय अधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर या ...
ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय कोविडच्या काळात सर्वसामान्य रुग्णांसह मराठी अभिनेते, शासकीय अधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर या रुग्णालयात मिळणाऱ्या आपुलकीच्या वागणुकीमुळे व योग्य उपचार पद्धतीमुळे चांगलेच पसंतीस उतरले होते. आता लसीकरणासाठीदेखील सर्वसामान्य नागरिकांसह मध्यमवर्गीय यांच्यापाठोपाठ मराठी अभिनेत्यांनीदेखील हजेरी लावून त्यावरील आपले प्रेम कायम ठेवले आहे. त्यानुसार सोमवारी ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अशोक समेळ यांनी सपत्नीक, तर मराठी अभिनेते अभिजित चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन लसीकरण करून घेतले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
जिल्हा समान्य रुग्णालयात योग्य उपचार मिळतील का, तेथील कर्मचाऱ्यांकडून नीट वागणूक मिळेल का, अशा अनेक शंका उपस्थित करून नकारात्मक दृष्टीने जिल्हा रुग्णालयाकडे पहिले जात होते. मात्र ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड १९ रुग्णालयात रूपांतर केले. त्या दिवसापासून या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातील डॉक्टर्सपासून ते सफाई कर्मचाऱ्यांकडून आपुलकीने व माणुसकीच्या नात्याने करण्यात येणारी विचारपूस, त्यांना देण्यात येणारे उत्तम जेवण, नास्ता आदी बाबींची घरच्या प्रकारे काळजी घेत, असल्यामुळे हे रुग्णालय अल्पावधीतच सर्वसामान्यांपासून ते उच्च पदस्थ अधिकारी आणि मराठी सिनेअभिनेत्यांच्यादेखील पसंतीस उतरले आहे. त्यात या रुग्णालयात मागील वर्षी अभिजित केळकर या अभिनेत्याने कोरोनाची लागण झाल्यानंतर दाखल होऊन येथील उपचाराचे कौतुक केले. त्यानंतर आता, जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रात ४५ वर्षीय व्याधीग्रस्तांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी पसंती देऊन लसीकरण केले. त्यात शनिवारी ३५०, तर रविवारी सुटीच्या दिवशी १४९ जणांनी लसीकरण केले. त्यानंतर सोमवारी ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अशोक समेळ व त्यांच्या पत्नी संजीवनी समेळ यांनी लसीकरण करून घेतले, यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र, नाटककार संग्राम समेळ व जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवारदेखील उपस्थित होते, तर दुसरीकडे मराठी अभिनेते अभिजित चव्हाण यांनीदेखील सोमवारी जिल्हा रुग्णालयात हजेरी लावून लसीकरण करून घेतले.