आनंद विश्व गुरुकुल आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा; 4 ऑक्टोबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 06:57 PM2022-09-28T18:57:36+5:302022-09-28T19:07:04+5:30
आंतरशालेय, आंतर-कनिष्ठ महाविद्यालयीन, आंतर-ज्येष्ठ महाविद्यालयीन आणि खुला गट अशा चार स्वतंत्र गटांमध्ये ही स्पर्धा ठाणे जिल्हा पातळीवर घेण्यात येणार आहे.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: शिक्षणाबरोबरच कला-साहित्याच्या वृद्धीसाठी प्रयत्नरत असलेले शारदा एज्युकेशन सोसायटीचे आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय आणि ठाण्यातील सांस्कृतिक विश्वात सक्रीय असलेले कै. मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी कथाकथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरशालेय, आंतर-कनिष्ठ महाविद्यालयीन, आंतर-ज्येष्ठ महाविद्यालयीन आणि खुला गट अशा चार स्वतंत्र गटांमध्ये ही स्पर्धा ठाणे जिल्हा पातळीवर घेण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांस प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात येतील. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्यांतर्फे आणि खुल्या गटातील स्पर्धकांनी स्वतंत्रपणे आपली प्रवेशिका ‘प्राचार्या, आनंद विश्व गुरुकुल, मित्तल पार्कजवळ, रघुनाथ नगर, वागळे ईस्टेट, ठाणे (प.) - 400604’ या पत्त्यावर दि. 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत पाठविण्याचे आवाहन कै. मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रा. अशोक चिटणीस यांनी केले आहे. या स्पर्धेत कथा सादरीकरणाचा कालावधी 15 मिनिटांचा राहील. अधिक माहितीसाठी 022-25825848/95 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क करावा, तसेच reception.avg@gmail.com या ईमेल आयडीवरही प्रवेशिका स्वीकारण्यात येतील, अशी माहिती शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली.