जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर लांबणीवर; मुख्य सचिवांचा दौरा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:21 AM2018-09-07T00:21:31+5:302018-09-07T00:21:39+5:30
राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन हे गुरुवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येणार होते. यावेळी वागळे इस्टेट, कशीश पार्क येथील महापालिकेच्या सुविधा भूखंडावर उभ्या राहिलेल्या इमारती सामान्य रुग्णालयासाठी देण्याचे महापालिकेने जवळपास निश्चित केले होते.
ठाणे : राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन हे गुरुवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येणार होते. यावेळी वागळे इस्टेट, कशीश पार्क येथील महापालिकेच्या सुविधा भूखंडावर उभ्या राहिलेल्या इमारती सामान्य रुग्णालयासाठी देण्याचे महापालिकेने जवळपास निश्चित केले होते. परंतु, तेथील स्थानिकांनी रहिवासी क्षेत्राचे कारण पुढे करून विरोध केला अन् त्यातच शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने मध्यस्थी करून मुख्य सचिवांचा दौरा रद्द केल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्णालयाचे स्थलांतर लांबणीवर पडले असून ते सुपर स्पेशालिटी कधी होणार याकडे रुग्णांचे लक्ष लागले आहे.
१९३६ साली दानस्वरूपात मिळालेल्या पाच इमारतींत ठाणे सामान्य रुग्णालय सुरू आहे. सध्या या पाच ब्रिटिशकालीन इमारती शिकस्त झाल्याने त्या पाडण्याबाबत मार्च महिन्यात शासनाने जीआर काढला. त्यामध्ये पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत रुग्णालय पाडू नये, अशी अट घातली. दरम्यान, रुग्णालय स्थलांतरासाठी पर्यायी जागा म्हणून वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटलचे नाव पुढे आले. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी त्या रुग्णालयाची पाहणी केली. पण, ते रुग्णालय केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने त्यावर निर्णय झालेला नाही. त्याचवेळी सामान्य रुग्णालयात ६७ वाढीव बेडसह १४० बेडचे सुपर स्पेशालिटी अशा ५७४ बेडच्या रुग्णालयाला शासनाने हिरवा कंदील देऊन ते सुरू करण्यासाठी इमारतींचे अंदाजपत्रक आणि आराखडे तयार करण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही दिले होते. यावेळी रुग्णालय प्रशासनाने मेंटल हॉस्पिटल येथील दोन इमारती, साकेत या आदी इमारतींची पाहणी केली. मात्र, साकेत येथील इमारत उपलब्ध नसल्याचे कारण देऊन कौसा, कासारवडवली येथील मार्केट आणि वागळे इस्टेट येथील कशीश पार्क येथील सुविधा भूखंडांवरील इमारतीचे पर्याय दिले होते. त्यापैकी कशीश पार्क येथील इमारतीची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेने सहमती दाखवल्यानंतर मुख्य सचिवांचा दौरा निश्चित झाला होता. पण, तो दौराच रद्द झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
उपसंचालकांकडून पाहणी
- मुंबई विभागाच्या आरोग्य उपसंचालक गौरी राठोड यांनी मुख्य सचिवांच्या दौºयाच्या पूर्वसंध्येला ठाणे सामान्य रुग्णालयाची पाहणी केली.
- गुरुवारी आरोग्य विभागाचे आयुक्त परिमल सिंग यांनीही शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याशी चर्चा केली.