जि. प. च्या पहिल्याच सभेत हक्कभंगाची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:52 AM2018-02-22T00:52:49+5:302018-02-22T00:52:49+5:30
ठाणे जिल्हा परिषदच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विषय समिती सभापतींची नावे जाहिर होण्यापूर्वी काही सदस्यांनी सभापती म्हणून बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली होती
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विषय समिती सभापतींची नावे जाहिर होण्यापूर्वी काही सदस्यांनी सभापती म्हणून बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हा सभागृहाचा अपमान असून त्या सदस्यांवर हक्कभंग दाखल करा, अशी मागणी विरोधकांनी बुधवारी लावून धरली. या सभेत विरोधकांनी सत्ताधारी अध्यक्षांना अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधक आक्र मक होत असल्याचे पाहून अध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करून हा ‘विषय’ मारून नेला. त्यावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात रंगणार पहिलाच सामना झडपड क्रिकेट सामन्यासारखा झाल्याचे दिसून आले.
ठाणे जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिलीच सर्वसाधारण सभा बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजिली होती. यावेळी, पाच विषय समितींसह पंचायत समितीच्या ९ समिती सदस्यांची निवड प्रक्रिया घेण्यात येणार होती. दरम्यान, विषय समितीच्या सभापतींची घोषणा केली जात असताना विरोधकांनी आक्षेप घेऊन काही सदस्यांनी सभापती म्हणून नावे जाहिर होण्यापूर्वीच बॅर्नरबाजीसह वृत्तपत्रांना जाहिरात देऊन गाजावाजा केला.अशाप्रकारे सभागृहाचा अपमान करणाºया त्या नवनिर्वाचित सभापतींवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काही क्षण शाब्दीक चकमक झाली. ती वाढण्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांनी विरोधकांसमोर वारंवार दिलगिरी व्यक्त करून विषय मारून नेला. त्यानंतरच उर्वरित पंचायत समितीची बिनविरोध निवडणूक झाली. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार आदी उपस्थित होते.