जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत घोडेबाजाराला वेग
By admin | Published: March 8, 2016 01:38 AM2016-03-08T01:38:40+5:302016-03-08T01:38:40+5:30
पालघरच्या जिल्हा नियोजन समितीची निवडणुक उद्या (मंगळवारी) होत असून नऊ जागांसाठी बारा उमेदवारामध्ये लढती रंगणार आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षानी ही निवडणुक गांभीर्याने घेतली असून
पालघर : पालघरच्या जिल्हा नियोजन समितीची निवडणुक उद्या (मंगळवारी) होत असून नऊ जागांसाठी बारा उमेदवारामध्ये लढती रंगणार आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षानी ही निवडणुक गांभीर्याने घेतली असून आज दिवसभर मतदाराच्या फोडाफोडीसाठी अनेक बैठका रंगल्याचे चित्र दिसून येत होते.
पालघर जिल्हापरीषदेच्या ५७ सदस्यापैकी, भाजपाकडे २१ सदस्य, शिवसेनेकडे १५ व बंडखोरीकरून विजयी झालेल्या अपक्ष असे १६ उमेदवार असून बहुजन विकास आघाडीकडे १०, माकपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ व काँग्रेसचा १ असे बलाबल असून सर्व पक्षांनी एकत्र येत १३ जागावर बिनविरोध निवड करून घेतली.
जिल्हापरिषद गटामध्ये पाच जागासाठी सहा उमेदवार रिंगणात असून भाजपाचे तीन व शिवसेनेच्या दोघांचा अंतर्भाव आहे. याच गटामधून राष्ट्रवादीच्या दामोदर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने मात्र राष्ट्रवादीच्या कोट्यातून दामोदर पाटील यांचे नाव राष्ट्रवादीने सुचविले नसल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे असून राष्ट्रवादीने काशिनाथ चौधरी यांना राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उभे केले आहे. राष्ट्रवादीच्या या पावित्र्यामुळे जि. प. गटातून निवडणुक होत आहे.
महानगरपालिका गटामध्ये तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असले तरी वसई-विरार महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीकडे ११५ नगरसेवकांपैकी १०९ नगरसेवक आहेत. त्यामुळे बविआचा एकतर्फी विजय होणार आहे. तर नगरपालिका गटामध्ये राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आणि शिवसेनेचे अतुल पाठक या पालघर नगरपरिषदेतील नगरसेवकांमध्ये सरळ सरळ लढत होत असून पालघर, जव्हार व डहाणू मधील एकूण ५८ नगरसेवक मतदार असल्याने राष्ट्रवादीपक्षाकडे २९ नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे दोन असे एकूण ३१ संस्थाबळ तर सेनेकडे २२ व भाजपाकडे पाच असे २७ चे संख्याबळ आहे. परंतु राष्ट्रवादीला पाठींबा देण्याबाबत काँग्रेसच्या नगरसेवकांना अजुन कुठल्याही सुचना आल्या नसल्याची माहिती काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने दिली. त्यामुळे काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना आपल्याकडे वळविण्यात सेना-भाजपा उमेदवार यशस्वी झाल्यास दोघांचे समसमान संख्याबळ होणार आहे. त्या दृष्टीने आज सकाळपासून फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. (वार्ताहर)