जिल्ह्याला मिळाल्या अवघ्या ४ हजार ८४० लसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:39 AM2021-05-16T04:39:10+5:302021-05-16T04:39:10+5:30
ठाणे : लसीच्या तुटवड्यामुळे राज्य सरकारने तूर्तास १८ ते ४४ वयोगटांच्या लसीकरणाला ब्रेक दिला आहे. परंतु, आता ४५ व ...
ठाणे : लसीच्या तुटवड्यामुळे राज्य सरकारने तूर्तास १८ ते ४४ वयोगटांच्या लसीकरणाला ब्रेक दिला आहे. परंतु, आता ४५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी येणाऱ्या लसींचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्याला शनिवारी केवळ चार हजार ८४० लसी मिळाल्या. त्यामुळे लसीकरण मोहीम वेगाने कशी राबवायची, असा पेच जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला पडला आहे.
जिल्ह्याला काही दिवसांपासून लसींचा तुटपुंजा पुरवठा होत आहे. त्यामुळे बहुतांश लसीकरण केंद्रे बंद असून, लसीकरण रडतखडत सुरू आहे. परिणामी सावळागोंधळ निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी ठामपाने आता रोजच्या रोज कोणत्या केंद्रावर किती लस उपलब्ध आहेत, याची माहिती देणे सुरू केले आहे. तरीही नागरिक पहाटेपासून केंद्राबाहेर लसींसाठी रांगा लावत आहेत. त्यात आता कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने अनेकांना दुसरा डोस घेण्यासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लसीच्या अभावांमुळे मागील तीन ते चार दिवस जिल्हा शासकीय रुग्णालयातील लसीकरणही बंद होते, तर ठाणे मनपातर्फे शनिवारी १६ ठिकाणी लसीकरण सुरू होते. दुसरीकडे शहरी भागात लस मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने आता येथील नागरिकांनी मुरबाड, खडवली, टिटवाळा, आदी ग्रामीण भागांकडे आपला मोर्चा वळविला आहे. कोविन ॲप किंवा इस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम, आदींद्वारे नागरिकांना कुठे किती लस उपलब्ध आहेत, याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शहरात ताटकळत राहण्यापेक्षा शहरांतील नागरिक थेट ग्रामीण भागात जाऊन लस घेत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणाची नोंदणी कशी करायचे हे माहीत नाही. अनेकांकडे मोबाईल नाही. असलाच तर ॲण्ड्रॉइड फोन नाही. त्यामुळे त्यांचे लसीकरण लांबणीवर पडले आहे. या साऱ्याचा फायदा शहरातील नागरिक घेताना दिसत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आलेल्या तुटपुंज्या साठ्यानंतर शनिवारी जिल्ह्याला पुन्हा अवघे चार हजार ८४० लसी मिळाल्या आहेत. त्यातून नागरिकांचे लसीकरण कसे करायचे, कोरोनाला कसे रोखायचे, असा पेच या शासकीय यंत्रणांना सतावू लागला आहे.
शहरनिहाय लसींचा साठा
ठाणे ग्रामीण - ५४०
कल्याण डोंबिवली - १०००
उल्हासनगर - ००
भिवंडी - ००
ठाणे महापालिका - १५००
मीरा-भाईंदर - ६००
नवी मुंबई - १२००
एकूण - ४८४०
-----------------