जिल्ह्यात अकरावीच्या १,१२,०९० जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 03:06 AM2018-05-19T03:06:18+5:302018-05-19T03:06:18+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेला यंदा एक लाख २१ हजार ६०८ विद्यार्थी बसले आहेत.
- सुरेश लोखंडे
ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेला यंदा एक लाख २१ हजार ६०८ विद्यार्थी बसले आहेत. यामधील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन यंदा ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एक लाख १२ हजार ९० विद्यार्थ्यांची अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश क्षमता निश्चित केली आहे. शहरी भाग वगळता यंदाही शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रवेश घेण्याची संधी आहे.
यंदाच्या अकरावी प्रवेशासाठीदेखील १० जूनपर्यंत पहिली आॅनलाइन प्रवेश यादी जाहीर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दहावीचा निकाल लवकरच लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. तो लागताच अल्पावधीत आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया हाती घेतली जाईल. तत्पूर्वी येथील माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ आदी सुमारे २६१ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी एक लाख १२ हजार ९० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित केली आहे. यापैकी भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तीन तालुक्यांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या महाविद्यालयांमध्ये आॅफलाइन अकरावी प्रवेश घेण्याची संधी आहे. त्यासाठीदेखील सुमारे १२ हजार ७६० जागा असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे सहायक शिक्षण निरीक्षक सुभाष गढरी यांनी सांगितले.
विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा ३२ हजार ४०० जागा आहेत. यातील ३० हजार जागांचे प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये होतील. तर, दोन हजार २०० प्रवेश विनाअनुदानित आहेत. स्वयंअर्थसहायित सुमारे २०० जागा आहेत.
मागील वर्षी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी सुमारे ३२ हजार ७८० जागा होत्या. यंदा मात्र सुमारे ३८० जागा कमी केल्याचे आढळून येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी कला शाखेच्या ७२०, विज्ञान शाखा प्रवेशासाठी ९६० जागा आणि वाणिज्य शाखेसाठी तीन हजार ६०० प्रवेश क्षमता निश्चित केली आहे. या तिन्ही शाखांचे पाच हजार २८० अनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश मिळणार आहेत. या तुकड्यांमध्ये माागील वर्षी तीन हजार ६८२ प्रवेश झाल्याची नोंद आहे. सहा हजार ४८० प्रवेश विनाअनुदानित तुकड्यांमध्ये होतील. यामध्ये मागील वर्षी तीन हजार २३ प्रवेश झाले होते.
>शहरी भागात ९९३०० आॅनलाइन प्रवेश
ंठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भार्इंदर आणि नवी मुंबई आदी शहरी भागांतील महाविद्यालयांमध्ये ९९ हजार ३३० विद्यार्थ्यांचे आॅनलाइन प्रवेश होणार आहेत. यापैकी कला शाखेचे १२ हजार ९७० प्रवेश होणार आहेत. या वर्षी कला शाखेच्या ९० जागा कमी केल्याचे निदर्शनास आले. यामध्ये एक हजार प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील आहेत. तर, उर्वरित २०० प्रवेश विनाअनुदानित आणि ९७० स्वयंअर्थसहायित प्रवेशाचे नियोजन करण्यात आले. याप्रमाणेच वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक प्रवेशासाठी ५३ हजार ९६० जागा आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चार हजार ४३० जागा वाढवण्यात आलेल्या आहेत. सुमारे ४४ हजार जागांवरील प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील आहेत. तर, चार हजार विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहायित तुकड्यांमध्ये ९६० प्रवेश होतील.