दिवा डम्पिंगला भंडार्लीत शोधला पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:48 AM2021-09-10T04:48:41+5:302021-09-10T04:48:41+5:30
ठाणे : सत्ताधारी शिवसेनेने आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच डम्पिंगचा प्रश्न सोडवण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ...
ठाणे : सत्ताधारी शिवसेनेने आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच डम्पिंगचा प्रश्न सोडवण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. डायघर आणि तळोजा येथील जागेचा प्रयोग फसल्यानंतर आता भंडार्ली येथे चार हेक्टर जागा संपूर्ण ठाणे शहराचा कचरा टाकण्यासाठी दहा वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेण्याचे निश्चित करून याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या महासभेने मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने गेली अनेक वर्षे दुर्गंधीमुळे हैराण झालेल्या दिवेकरांची या समस्येमधून लवकरच सुटका होणार आहे.
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठामपाने गेल्या काही वर्षांत अनेक प्रयोग केले आहेत . मात्र, हे सर्वच प्रयत्न अपयशी ठरल्याने ठाणे शहरात अजूनही कचऱ्याच्या प्रश्न अनुत्तरितच आहे. आपल्या क्षेत्रातील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सक्षम प्रकल्प गेल्या अनेक वर्षांत उभारता न आल्याने ठाणे महापालिकेला अनेक वेळा हरित लवाद, उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने वारंवार नोटिसादेखील बजावल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यात सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन भंडार्ली येथे दहा वर्षांच्या करारावर भाडेतत्त्वावर जागा घेण्याचे निश्चित केले.
शिवसेना आश्वासनपूर्तीकडे ...
सत्ताधारी शिवसेनेकडून दिव्यातील डम्पिंग बंद करण्याचे गाजर ठाणे महापालिकेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दाखविले जाते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता अद्याप शिवसेनेला करता आलेली नव्हती. दिव्यात डम्पिंग आणल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांना यापूर्वी निवडणुकीमध्ये पराभूत व्हावे लागले होते. हा प्रस्ताव सादर केल्यानंतर जागेच्या दराबाबत नजीब मुल्ला यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर काही काळ मढवी हे भावुक झाले होते. जर या प्रस्तावाला मंजुरी नाही मिळाली तर यापुढे एकही कचऱ्याची गाडी दिव्यात येऊ देणार नाही, असा इशारा पुन्हा एकदा त्यांनी दिला. मात्र, प्रस्ताव मंजूर झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.