दिवा रेल्वे फाटक धोकादायक!,‘आता तरी जागा हो दिवेकर’ संघटनेमार्फत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:59 AM2018-06-21T02:59:58+5:302018-06-21T02:59:58+5:30
दिवा रेल्वे सुरक्षा बल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सद्यस्थितीत तिन्ही मार्गांवर १५ रेल्वे फाटक सुरू आहेत.
ठाणे : दिवा रेल्वे सुरक्षा बल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सद्यस्थितीत तिन्ही मार्गांवर १५ रेल्वे फाटक सुरू आहेत. त्यामध्ये दिवा रेल्वे फाटक सर्वात वर्दळीचे फाटक असल्याने ते दिवसेंदिवस धोकादायक बनत चालले आहे. त्यामुळे भविष्यात येथे उड्डाणपुलाशिवाय पर्याय नसून तो व्हावा, यासाठी गुरुवारी दिवा रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
ठाणे-कल्याण या दोन रेल्वे जंक्शनमधील दिवा हे ब्रिटीशकालीन स्थानक आहे. येथून मध्य रेल्वे, दिवा-पनवेल आणि दिवा-वसई अशा तीन मार्गांवर रेल्वे धावतात. या तिन्ही मार्गांवर येणारे रेल्वे फाटक हे दिवा सुरक्षा बल पोलीस ठाण्यांतर्गत येतात. या तिन्ही मार्गांवर एकूण १६ रेल्वे फाटक आहेत. त्यातील एका फाटक ाजवळ भुयारी मार्ग सुरू झाल्याने ते फाटक एक वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीला दिवा-पनवेलवर ७ तर दिवा-वसईवर ७ फाटक आणि मध्य रेल्वेवर एक असे १५ फाटक सुरू आहेत. त्यातील दिवा सोडल्यास इतर रेल्वे फाटक परिसरात येजा करणारी वाहने असो या पादचारी यांची वर्दळ दिव्याच्या एक टक्के सुद्धा नाही. त्यामुळे या फाटकांवर सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रश्नच उद्भावत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातच, सोमवारी झालेल्या दिवा रेल्वे फाटकावरील अपघातापूर्वी म्हणजे जवळपास एक वर्षांपूर्वी दातिवली येथे असाच एक रेल्वे अपघात झाला होता. पण, सुदैव्याने त्या घटनेत,कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती.
दिवा रेल्वे फाटकावरील उड्डाल पूल स्थानिक गटबाजी आणि राजकारण्यांच्या दबावाला बळी पडला आहे. त्यामुळे तो होण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप दिव्यातील ‘आता तरी जागा हो दिवेकर’
या संघटनेने केला. तर, प्रशासनाला जागे करण्यासाठी दिवा
स्थानकात स्वाक्षरी मोहीम आयोजित केली आहे.
>फाटक ओलांडण्यात सायकलस्वार आघाडीवर
दिवा रेल्वे फाटकांवर झालेल्या अपघातानंतर फाटक ओलांडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. तर, मागील तीन दिवसांत रेल्वे प्रशासनाने रेल्वे कायद्यान्वे १८ जणांवर कारवाई केली असून त्यामध्ये सर्वाधिक १२ जण हे सायकलस्वार असून उर्वरित सहा जण दुचाकीस्वार आहेत. बुधवारी दुपारीपर्यंत ९ जणांवर कारवाई केली असून ते सर्व जण सायकलस्वार आहेत. तर,अपघातानंतरही येथील नागरिकांची फाटकाखाली
शिरकाव करून ते ओलांडण्याची सवय काही जात नसल्याचे दिसत आहे.