हक्काच्या ९० लीटर पाण्यासाठी दिवावासीयांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 01:29 AM2019-11-26T01:29:37+5:302019-11-26T01:30:04+5:30
पिण्यासाठी हक्काचे ९० लीटर पाणी मिळावे, या मागणीसाठी दिव्यातील रहिवाशांनी दिवा प्रभाग समितीसमोर आंदोलन केले.
ठाणे : पिण्यासाठी हक्काचे ९० लीटर पाणी मिळावे, या मागणीसाठी दिव्यातील रहिवाशांनी दिवा प्रभाग समितीसमोर आंदोलन केले. नियमानुसार येथील नागरिकांना ठाण्याप्रमाणे प्रत्येक दिवशी प्रतिव्यक्ती १३५ लीटर पाणी मिळायला हवे. यात पिण्याचे ९० लीटर आणि वापरण्यासाठी ४५ लीटर अपेक्षित आहे. मात्र, ते आजही मिळत नाही, पाण्याची वानवा आहे. त्यामुळेच हे आंदोलन केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या प्रमुख मागणीसह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठीसुद्धा आंदोलन करण्यात आले. आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा होतो. परंतु, बिल मात्र महिन्याचे येते. यात अनेक नागरिकांना पिण्याचेच ९० लीटर पाणी मिळत नाही, तेथे वापरायचे पाणी कुठून मिळणार, चारचार दिवसांनी होणारा पाणीपुरवठा कधी थांबणार, महिन्याचा पगार पाण्यासाठी खर्च होतो. तरीही सत्ताधाऱ्यांना जाग येत नसेल, तर हक्कासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून येथील नागरिक टँकरसाठी आठवड्याला एक हजार रु पये खर्च करत आहे, त्यामुळे तो पालिकेचे २०० रु पये पाणीबिल भरणार नाही का, असा सवालही यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी दिवा प्रभाग समितीसमोर धरणे आंदोलन केले. यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही, तर येत्या २ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयासमोर निषेध आंदोलनही केले जाणार असल्याची माहिती भाजपचे दिवा सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी दिली.