गणेशोत्सवासाठी दिवा-सावंतवाडी, रत्नागिरी विशेष ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:47 AM2021-09-04T04:47:55+5:302021-09-04T04:47:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिवा येथून विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात, अशी मागणी मनसेचे आमदार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिवा येथून विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली होती. त्याला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दिला असून, दिवा ते सावंतवाडी आणि दिवा ते रत्नागिरी या दोन आरक्षित गाड्या दोन्ही दिशांना ७ ते २९ सप्टेंबरदरम्यान सोडण्यात येणार आहेत.
कोकणातील बहुतांश रहिवासी नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. दरवर्षी ते गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जातात. मात्र, कोरोनामुळे पहिल्या लॉकडाऊनपासून दिवा-सावंतवाडी पॅसेंजर व दिव्याला थांबा असणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर या गाड्या बंद होत्या. या गाड्या अद्यापही सुरू झालेल्या नसल्याची व्यथा पाटील यांनी मांडली होती. गणेशोत्सवासाठी रेल्वेने काही विशेष गाड्यांची घोषणा केली आहे; परंतु त्यात दिवा येथून एकही गाडी सोडलेली नाही, याकडे पाटील यांनी रेल्वेचे लक्ष वेधले होते. मात्र, त्याला रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आरक्षित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
प्रवासी संघटनांनीही केला पाठपुरावा
गणेशोत्सवात दिवा येथून गाड्या सोडण्याची मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघ, उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्था आदींनीही केली होती. त्या मागणीला देखील न्याय मिळाल्याने प्रवासी संघटना देखील समाधानी आहेत.
-------------