दिवेकरांचे आरोग्य आले धोक्यात, खाजगी डॉक्टरांचाही असहकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 02:17 PM2020-03-26T14:17:03+5:302020-03-26T14:20:03+5:30
एकीकडे कोरोनाची वाढती धास्ती आणि दुसरीकडे दिव्यात आरोग्य केंद्र नसल्याने येथील नागरीकांची डोकेदुखी वाढत आहे. दोन वर्षापासून आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मंजुर आहे. परंतु जागा मिळत नसल्याने आरोग्य केंद्र लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता कंटेनेरमध्ये आरोग्य केंद्र सुरु करण्याचा विचार सुरु झाला आहे.
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र तिकडे दिव्यात पालिकेचे आरोग्य केंद्र आजही नसल्याची बाब समोर आली आहे. दिव्यात खाजगी स्वरुपात ६१ डॉक्टरांचे क्लिनीक सुरु होते. ते देखील डॉक्टरांनी बंद केल्याची बाब समोर आली आहे. मात्र यातील काहींनी आता आपले क्लिनीक सुरु केले आहे. त्यातही या भागात पाच ठिकाणी आपला दवाखाना सुरु होणार होते. परंतु त्यालाही आता कोरोनामुळे विलंब होणार आहे. त्यामुळे दिव्यातील सुमारे पाच लाख नागरीकांचे आरोग्य आता धोक्यात आले आहे.
दिव्याची लोकसंख्या पाच लाखांच्या आसपास आहे. परंतु, या ठिकाणी आजच्या घडीला पालिकेचे अधिकृत असे आरोग्य केंद्र नाही. या भागात आरोग्य केंद्र व्हावे अशी मागणी येथील नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार या भागासाठी सुमारे दोन वर्षापूर्वी आरोग्य केंद्र मंजुरही झाले होते. परंतु अद्यापही ते सुरु झालेले नाही. येथील बहुसंख्या भाग हा सीआरझेडने व्यापलेला असल्याने पालिकेला येथे अधिकृत जागा अद्यापही मिळू शकलेली नाही. अधिकृत जागा दाखवा त्यानंतरच आरोग्य केंद्र सुरु होईल असे पालिकेचे म्हणने आहे. खाजगी जागाही अद्याप पालिकेला येथे मिळू शकलेले नाही. अनाधिकृत जागेसाठी पालिका पैसे टाकण्यास तयार नाही. त्यामुळे आरोग्य केंद्राचा प्रस्ताव लांबणीवर पडला आहे.
दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दिव्यात प्रक्टीक करणाऱ्या ६१ डॉक्टरांनी आपले खाजगी क्लिनीकही बंद केले होते. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. परंतु बुधवारी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी या डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना क्लिनीक सुरु करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार काहींनी क्लिनीक सुरु केले असल्याचे मढवी यांनी सांगितले. तर या भागासाठी देखील ५० पैकी पाच आपला दवाखाना मंजुर झालेले आहेत. त्याचेही काम सुरु होणार होते. परंतु कोरोनामुळे आत ते कामही लांबणीवर पडले आहे. आत हे दवाखाने या भागात केव्हा सुरु होणारे हे अनुत्तरीतच आहे. त्यात प्रभाग समिती अंतर्गत एक आरोग्य केंद्र आहे, परंतु ते देखील शीळ भागात आहे, एवढया लांब जाणे सर्वांनाच शक्य नाही. सध्या तर अशा परिस्थितीत अशक्यच आहे. एकूणच आता दिव्यातील पाच लाख लोकसंख्येपुढे आरोग्य केंद्र नसल्याने आरोग्याचा प्रश्न जटील बनू पाहत आहे.
- दिव्यात आरोग्य केंद्रासाठी अधिकृत जागा मिळत नाही, अनाधिकृत जागेत काम करण्यास पालिका तयार नाही, त्यामुळे आता या भागात कंटेनरमध्येच आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार पालिकेकडे विचार विनियम सुरु असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल अशी माहिती माजी उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिली.