नाट्यजल्लोषमधील विषयांची विविधता आणि मुलांचा सळसळता उत्साह हीच माझ्यासाठी अपूर्व भेट! ’- रत्नाकर मतकरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 03:55 PM2018-12-25T15:55:31+5:302018-12-25T16:01:12+5:30

वंचितांचा रंगमंचाच्या पाचव्या पर्वाचे पडघम वाजू लागले आहे. नुकतेच नाट्यजल्लोषमध्ये लोकवस्तीतील नाटिका सादर होणार आहे. 

Diversity of the topics of dramatization and the enthusiasm of the children are an amazing gift for me! '- Ratnakar Matkari | नाट्यजल्लोषमधील विषयांची विविधता आणि मुलांचा सळसळता उत्साह हीच माझ्यासाठी अपूर्व भेट! ’- रत्नाकर मतकरी  

नाट्यजल्लोषमधील विषयांची विविधता आणि मुलांचा सळसळता उत्साह हीच माझ्यासाठी अपूर्व भेट! ’- रत्नाकर मतकरी  

Next
ठळक मुद्देवंचितांचा रंगमंचाच्या पाचव्या पर्वाचे पडघम लागले वाजू ८० वर्ष पूर्तीबद्दल मतकरी सरांना मुलांची खास मानवंदनावैविध्यपूर्ण विषयांच्या प्रभावी नाटिका

ठाणे : ‘आज वंचितांच्या रंगमंचाला मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद बघून आनंद तर झालाच आहे पण हा उपक्रम सुरू करण्यामागचा जो मुख्य उद्देश होता, की वस्तीतील मुलांच्या विचारांना चालना मिळावी आणि त्यांनी ते विचार नाटकातून व्यक्त करावेत, या उद्देशाच्या पूर्तीकडे चाललेल्या यशस्वी वाटचालीचे समाधान वाटते आहे!’ असे जेष्ट नाटककार, दिग्दर्शक आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी गेले दोन दिवस  ठाण्यात रंगलेल्या नाट्यजल्लोषाच्या पाचव्या पर्वाच्या सांगता समारंभात बोलताना म्हणाले. 

‘बालनाट्य’ आणि ‘समता विचार प्रसारक संस्थेतर्फे आयोजित नाट्यजल्लोषच्या ‘समस्याचे समाधान’ या यंदाच्या थीमचे स्वागत करून ते पुढे म्हणाले, ‘मुलांनी आपल्या गरिबीचा बाऊ न करता सभोवतालच्या परिस्थितीचा सकारात्मकतेने विचार करावा,समस्या ओळखून त्यांचे समाधान काढण्याचा प्रयत्न करावा हीच ‘वंचितांचा रंगमंच’ सुरू करण्यामागची संकल्पना आहे आणि आज पाच वर्षांनी या संकल्पनेचा जो मूर्त आविष्कार या मुलांच्या आशयसंपन्न सादरीकरणातुन साकारलेला दिसला तो खूप दिलासा देणारा आहे. या उपक्रमाच्या यशामागे अनेक स्वाभाविक अडचणीना तोंड देत नाटिका बसवणे या जिकिरीच्या कामात ‘समता विचार प्रसारक संस्थे’च्या कार्यकर्त्यांचे खूप मोठे योगदान आहे. ठाणे महानगर पालिकेने गरीब वस्तीतील मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘क्रिडा व कला केंद्रे’ स्थापन करावीत आणि ‘बालनाट्य महोत्सवा’साखे सांस्कृतिक उपक्रम बंद न करता त्यांना प्रोत्साहन द्यावे.’ या वेळी स्थानिक नगरसेविका आणि शिक्षण समिती सदस्य नंदिनी विचारे या मुलांचे कौतुक करण्यासाठी आवर्जून हजर होत्या. त्यांनी संगितले की, ’अशा गरीब मुलांच्या व्यक्तिमत्वाला उभारी देण्याच्या सर्व उपक्रमाला ठाणे महानगर पालिकेचे नेहमीच सहकार्य लाभेल याची खात्री बाळगा.’

८० वर्ष पूर्तीबद्दल मतकरी सरांना मुलांची खास मानवंदना

      यावर्षी रत्नाकर मतकरींच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमात विविध विषयांच्या नाटिकांबरोबरच, सर्व सहभागी कलाकार आणि उपस्थितांच्या सहयांची मोहोर उमटविलेलं मानपत्र देऊन त्यांना मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी सुप्रसिद्ध नाट्य, सिने आणि टेलिविजन कलाकार सुप्रिया विनोद यांनी म्हटले की, ‘नाटक हेच मतकरी सरांचे जीवन आहे,त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या मुलांनी नाटक रूपाने दिलेली ही भेट त्यांच्यासाठी सर्वात प्रिय असेल!’ गेली पाच वर्ष न चुकता उपस्थित राहून या उपक्रमाला नेहमीच प्रोत्साहन देत असलेले सुप्रसिद्ध नाट्यकर्मी उदय सबनीस  म्हणाले,’ नाटक म्हणजे खोट्याकडुन खर्‍याकडे जाणारा प्रवास! आज जरी दुनिया खोट्याची असली तरी खरे अस्सल व्यक्तिमत्व घडवण्याचा हा आगळा वेगळा प्रयत्न मला खूप भावतो.’ यावेळी आवर्जून आलेले सुप्रसिद्ध निर्माते मिलन टोपकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सहभागी मुलांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करताना ठाण्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि ‘समता विचार प्रसारक संस्थेचे’ अध्यक्ष संजय मंगला गोपाळ यांनी जाहीर केले की पुढच्या वर्षीचा नाट्यजल्लोष हा सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकाराने ‘मनोविकास’ या विषयावर असेल आणि तो जून महिन्यात घेण्यात येईल,  तसेच भविष्यात आणखी पाच जिल्ह्यात ‘नाट्यजल्लोष’ पोहोचण्याचे काम चालू झाले आहे.

वैविध्यपूर्ण विषयांच्या प्रभावी नाटिका

      ‘नाट्यजल्लोष’ च्या या पाचव्या पर्वात ठाण्यातील विविध वस्त्यांमधून १४ नाटिका सादर करण्यात आल्या. या वर्षी प्रथमच सहभागी होत असलेल्या भादवड, भिवंडी येथील मुलांनी आजी - आजोबा आणि नातवंड यांच्या एकमेकांवर असलेल्या भावनिक अवलंबनाबद्दल सुंदर नाटिका सादर केली, नाव होतं- 'आधार- कधी आम्हाला कधी तुम्हाला'. तसेच राम नगर मधुन 'लेक वाचवा' या नाटिकेतुन मुलींना आणि त्यांच्या स्वप्नांना खुरडणार्या आजच्या समाजातील रुढी आणि चालींना भिडण्याचे आवाहन केले. या दोन्ही नाटिका बसवण्यासाठी ‘आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या’ चेतन दिवे आणि सहकार्यांनी पुढाकार घेतला. 
येऊरच्या ठाणे महानगर पालिकेतील मुलांनी बालमजुरीच्या समस्येमुळे मुलांना शिक्षणापासुन कसे वंचित रहावे लागते हे आपल्या नाटिकेतुन दाखवलं. सावरकर नगरातील मुला मुलींनी मुलींवर अत्याचार झाल्यास त्या मुलीला दोष न देता अत्याचार करणार्या मुलाला समाजाने शिक्षा केली पाहिजे हे 'एक नविन पायंडा' या नाटिकेतुन प्रभावीपणे सादर केले. उथळसर येथील गटाने 'सेहद'या नाटकातुन बाहेरील उघडे, तेलकट, मसालेदार खाद्यपदार्थ खाल्ल्याने प्रकृतीवर वाईट परिणाम होउन आजारी पडायला होतं हे दाखवलं. कोपरी गटाने मुला मुलींच्या कामात भेदभाव नसावा यावर 'हे का को म्हणजे हे काम कोणाचे' ही नाटिका सादर केली. त्यांच्या या अभिनव विषय निवडीमुळे आणि त्याच्या रंजक व प्रभावी सादरीकरणामुळे प्रेक्षकांना खूप आवडली. कल्याण येथील कचरा वेचक वस्तीतील मुलामुलींनी 'आम्ही कोण' ही त्यांना दररोज सामना कराव्या लागत असलेल्या समस्यांना वाचा फोडणारी  हृदयस्पर्शी नाटिका सादर केली. मनोरमा नगरमधील एका गटाने निवडणुकीच्या वेळेस होणार्‍या गमतीजमतीवर नाटिका सादर केली. किसन नगरच्या गटाने नेहमीप्रमाणेच ‘संविधानाचा स्वीकार’ या ज्वलंत विषयावर अतिशय सुंदर पद्धतीने नृत्य नाटिका सादर केली. मनोरमा नगर मधील दुसर्‍या गटाने सदध्या चर्चेत असलेल्या ‘लसीकरण’ मोहिमेचे महत्व विषद करणारी नाटिका सादर केली. मानपाडा येथील एका गटाने ‘नागरी स्वच्छता’ हा सर्वांना भेडसावणार्‍या समस्येला तोंड देण्यासाठी काय करू शकतो हे दर्शवणारी नाटिका सादर केली. माजिवडा येथील गटाने ‘ मोबाइलचे दुष्परिणाम’ हा तरुणाईच्या जिव्हाळ्याचा विषय प्रभावीपणे सादर केला. घनसोळी येथील ‘वुई नीड यु’ या संस्थेच्या मुलांनी सदध्या रान उठवल्या गेलेल्या ‘आरक्षण’ या विषयाची माहिती देणारी नाटिका सादर केली. शेवटी मानपाडा गटाने‘अंधश्रद्धा’ हा संवेदनशील विषय अत्यंत सफाईदारपणे सादर केला, ज्यात नवरसांची अभिव्यक्ती दिसून आली. वंचित वस्तीतील मुलांनी आणि गट प्रमुखांनी काहीही साधने हाताशी नसताना,अभ्यास, घरकाम, बाहेरील काम, आजारपण अशा सारख्या अनंत अडचणीना तोंड देत प्रचंड मेहनत करत अशी प्रभावी नाटके सादर केल्यामुळे उपस्थित मान्यवर भारावून गेले.  या कार्यक्रमाला संजीव साने, मयूरेश भडसावळे, महेंद्र मोने, जयंत कुलकर्णी, प्रज्ञा सावरगावकर, प्रिती छत्रे, निलेश मयेकर, महेंद्र भंडारे, मिनल सोहोनी, नीता कर्णिक, धनश्री केतकर, श्यामल आणि शरद सोमण, वृषाली विनायक, अविनाश कदम, अशोक जाधव संजू जोशी,गायत्री आदि मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे विडियो चित्रीकरण शकील अहमद यांनी केले.  नाट्यजल्लोषच्या यशस्वी आयोजनासाठी ‘समता विचार प्रसारक संस्थेचे कार्यकर्ते आणि गट प्रमुख, लतिका सु.मो., मनीषा जोशी, हर्षलता कदम, सुनील दिवेकर, मीनल उत्तुरकर, मलूष्टे मॅडम, संजय निवंगुणे, दीपक वाडकर, लता देशमुख, गौरव हजारे, करण औताडे, दुर्गा माळी,नीलेश दंत, ओंकार जंगम, चेतन दिवे, निशिगंधा चूडजी, आश्विनी मोहिते, सूर्यकांत कोळी आदिनी सर्व प्रकारे मेहनत घेतली. ‘ठाणे आर्टिस्ट गिल्ड’ (TAG) या संस्थेच्या नीलिमा सबनीस, मानसी जोशी, सविता दळवी, सुयश पूरोहित, उमेश दांडेकर आदि कलाकारांनी गटांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

Web Title: Diversity of the topics of dramatization and the enthusiasm of the children are an amazing gift for me! '- Ratnakar Matkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.