दिव्यातील पाडकाम कारवाई १० दिवसांसाठी लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 01:58 AM2019-12-11T01:58:58+5:302019-12-11T01:59:20+5:30
मुदत मागितल्याने प्रशासनाने घेतला काढता पाय
ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील कांदळवणावर मागील तीन वर्षांपासून उभ्या राहिलेल्या चाळी आणि इमारतींवर कारवाईसाठी मंगळवारी गेलेल्या जिल्हा प्रशासनाला कारवाई न करताच खाली हात परतवावे लागले. कारवाईच्या ठिकाणी जवळपास ४ ते ५ हजारांपेक्षा अधिक नागरिक जमा झाल्याने काही काळ या ठिकाणचे वातावरण गंभीर झाले होते. न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी वेळ मिळावा आणि न्यायालयातही जर विरोधात निर्णय लागला तर संसार हलवण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती शेकडो रहिवाशांनी जिल्हा प्रशासनाला केली. त्यानुसार त्यांना १० दिवसांची मुदत दिल्याची माहिती ठाणे तहसीलदारांनी दिली.
दिव्यात खारफुटींची कत्तल करून त्यावर तीन वर्षांत उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी येथील बांधकामांवर कारवाई करण्यासाठीप्रशासनाचे पथक पोलीस बंदोबस्तात गेले होते. दिव्यातील साबे गावात ही १००० हून अधिकची बांधकामे असून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार होती. मात्र, कारवाईच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याने प्रशासनाला कारवाई करता आली नाही.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा परिसरातील सर्व्हे क्र मांक २३६, ७९, ८० आणि ७५ यावर कांदळवने नष्ट करून त्यावर बांधकामे उभारल्याचा दावा करून जिल्हाधिकारी कार्यालयाने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला. यापूर्वी अशाच प्रकारे ठाणे महापालिकेने या भागातील काही बांधकामांवर कारवाई केली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकारी प्रशासनाने या संदर्भात पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार आदिक पाटील यांनी दिवा परिसरात बॅनरवर जाहीर नोटीस लावून येथील रहिवाशांना ९ डिसेंबरपर्यंत घरे रिकामी करण्याचे सांगितले होते. तसे न केल्यास बळजबरी घरे रिकामी करण्यात येतील व तो खर्च घरमालकांकडून वसूल करण्यात येईल, अशी तंबीही दिली होती. मंगळवारी ही कारवाई टळली असली तरी भविष्यात ती होणार असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे.
रहिवाशांच्या दबावापुढे जिल्हा प्रशासन नरमले
दिव्यातील बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जिल्हा प्रशासनाच्या पथकाला रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जवळपास ४ ते ५ हजार रहिवाशी या ठिकाणी जमा झाले होते. कारवाईसाठी आणलेल्या जेसीबीच्या समोरच अनेक जण येऊन उभे राहिल्याने वातावरण चांगलेच तापले होते. अनेक जणांनी जेसीबीला पुढे येऊच दिले नाही. त्यामुळे प्रशासनानेदेखील नरमाईची भूमिका घेऊन तत्काळ कारवाई केली नाही.