दिव्यातील टॉयलेट घोटाळ्याची एसीबी मार्फत चौकशी करा, आमदार संजय केळकर यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 04:12 PM2017-10-21T16:12:34+5:302017-10-21T16:21:51+5:30
ठाणे महापालिकेत सध्या टक्केवारीचे राजकारण गाजत असतांनाच दिव्यातील टॉयलेट घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. न बांधलेल्या टॉयलेटसाठी पालिकेने १ कोटी १९ लाख रुपयांचे बील अदा केल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे - दिव्यातील प्रभाग क्रमांक ६५ मध्ये शौचालय न बांधताच त्याचे बील मात्र ठेकेदाराला अदा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीबी मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
एकीकडे ठाणे महापालिका स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध स्वरुपाचे टॉयलेट उभारत आहे. परंतु दुसरीकडे मात्र टॉयलेट न बांधतांच त्याचे बील मात्र लाटण्याचा प्रकार दिव्याच्या निमित्ताने पुढे आला आहे. २०१४ मध्ये ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणार्या जुन्या प्रभाग क्र मांक ६५( नवीन प्रभाग क्र .२७,२८,२९) मध्ये नवीन शौचालय बांधणीसाठी १ कोटी १९ लाख रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. निविदा आणि अन्य कायदेशीर प्रक्रि या पार पडल्यानंतर मे. एल.के. देवळे या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. कंत्राटदराने काम सुरू केले व शौचालय बांधून झाले म्हणून महापालिकेने कंत्राटदाराला बिलाची रक्कम सुद्धा अदा केली. परंतु, वास्तविक येथे एकही शौचालय बांधण्यात आले नसल्याचा आरोप केळकर यांनी केली आहे. साडेचार लाख लोकसंख्येच्या तुलनेत दिव्यात मूलभूत सोईसुविधा तुटपुंज्या स्वरूपात आहेत. रस्ते, पाणी, गटार या समस्यांबरोबरच स्टेशन पासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर महापालिकेचे एकही सार्वजनिक शौचालय नाही. अशातच नवीन शौचालय बांधणीसाठी मंजूर झालेला सुमारे १ कोटी १९ लाखाचा निधी कंत्राटदार, अधिकारी व तत्कालीन नगरसेवक यांनी परस्पर लाटला आहे. याची लेखी माहिती मिळावी यासाठी माहिती अधिकारान्वये सुद्धा माहिती दिली जात नाही. यामुळेच याची लेखी तक्र ार करून चौकशी करावी अशी मागणी भाजप दिवा शीळ विभाग अध्यक्ष अँड.आदेश भगत यांनी आयुक्त व आमदार संजय केळकर यांचे कडे केली आहे. वास्तविक दिव्यातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त असताना शौचालयाच्या कामात इतका मोठा भ्रष्टाचार झाला असल्याने सर्व संबंधित भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदार व तत्कालीन नगरसेवक यांची एसीबी मार्फत चौकशी कारावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पोलीस उपायुक्त, लाच लुचपत विभाग,ठाणे यांच्याकडे केली आहे.