अंघोळीची गोळी संस्थेला मिळाला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 07:41 PM2018-10-25T19:41:09+5:302018-10-25T19:42:00+5:30
प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्षसंवर्धन या विषयावर सातत्याने काम करीत आहे.
डोंबिवली : प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्षसंवर्धन या विषयावर सातत्याने काम करीत आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन दिव्या फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या वतीने राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.
दिव्या फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात समाज भान जपणाºया तरूणाईला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. झाडांना संवेदना असतात त्यामुळे झाडांना ठोकले जाणारे बॅनर, पोस्टर आणि खिळे काढण्याची अनोखी खिळेमुक्त झाडं ही मोहिम अंघोळीची गोळी या संस्थेने सुरू केली आहे. अगदी अल्पावधीतच ही मोहिम व्यापक पध्दतीने महाराष्ट्रभर पसरली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था आणि युवकांच्या गटांच्या मदतीने खिळेमुक्त झाडं ही मोहिम आज सुरू आहे. पुण्याच्या माधव पाटील यांनी सुरू केलेली अंघोळीची गोळी ही संस्था प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत या तत्वांचा प्रसार करीत आहेत.
संस्थेचे खिळेमुक्त झाड मोहिमेचे मुंबईचे समन्वयक तुषार वारंग म्हणाले, पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद नक्कीच आहे. मात्र पर्यावरण संवर्धनाच्या कामात सर्वसामान्य जनतेने उतरणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करणे देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे सांगितले.
खिळेमुक्त झाड मोहिमेचे ठाणे जिल्हा समन्वयक अविनाश पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर १ जानेवारी हा दिवस अंघोळीची गोळी म्हणजेच पाणी बचत करण्याचा दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि यापुढे महाराष्ट्राच्या इतर जिल्हयात आणि शहरात खिळेमुक्त झाडं त्याचबरोबर बॅनर, पोस्टरमुक्त झाडं आणि आळेयुक्त झाडं मोहिम विस्तारण्याचा मानस आहे.
माधव पाटील, प्रमोद शेवळे, राजेश राऊत आणि तेजश्री देवडकर यांनी अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दत्ता बारगजे आणि रेखा बारगजे यांनी स्वीकारला.