गतवर्षीच्या निधीसाठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिव्यांगांची बोंबाबोंब

By अजित मांडके | Published: January 1, 2024 01:26 PM2024-01-01T13:26:16+5:302024-01-01T13:26:27+5:30

आर्थिक वर्ष संपत असतानाही दिव्यांग कल्याणकारी निधीचा विनियोग होत नसल्याने दिव्यांगांची कुचंबणा होत असून येत्या दोन दिवसात दिव्यांगांचे आधारकार्ड लिंक करुन योग्य ती कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. 

Divyang welfare fund was not spent, so disabled people protested in Thane | गतवर्षीच्या निधीसाठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिव्यांगांची बोंबाबोंब

गतवर्षीच्या निधीसाठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिव्यांगांची बोंबाबोंब

ठाणे : सन 2023-24 हे आर्थिक वर्ष संपत आले आहे. मात्र , दिव्यांग कल्याण निधी खर्च करण्यात आलेला नाही. त्यामुळे ठाणे महानगर पालिका हद्दीतील दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमास खिळ बसली आहे, असा आरोप करीत अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान यांच्या नेतृत्वाखाली ठामपा मुख्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी राज्य तथा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण अंदाजपत्रकापैकी सुमारे 5 टक्के निधी दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी राखीव ठेवण्याचे सक्तीचे करण्यात आलेले आहे. त्यानुसार ठाणे महानगर पालिकेकडूनही अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, ही तरतूद केवळ कागदी घोडे नाचविण्यापुरतीच मर्यादीत असल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी हा निधी सुयोग्य पद्धतीने खर्च करण्यात येत नाही.  सन 2023-24 हे आर्थिक वर्ष पुढील दोन महिन्यात संपुष्टात येणार असूनही दिव्यांगांना सक्षम करता येईल, अशा योजना राबविण्यात आलेल्या नाहीत. किंवा त्यांना सक्षम करण्यासाठी निधीचे वाटपही करण्यात आलेले नाही. हा प्रकार म्हणजे दिव्यांग अधिकार अधिनियम 2015 चा अवमान आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्याने दिव्यांग सक्षम होत नसून त्याच ठाणे महानगर पालिकेचे संबधित अधिकारी जबाबदार आहेत.  आर्थिक वर्ष संपत असतानाही दिव्यांग कल्याणकारी निधीचा विनियोग होत नसल्याने दिव्यांगांची कुचंबणा होत असून येत्या दोन दिवसात दिव्यांगांचे आधारकार्ड लिंक करुन योग्य ती कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान,  समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त दिक्षित यांनी दिव्यांग शिष्टमंडळाची भेट घेऊन आगामी दहा दिवसात अर्ज वितरण करून निधीवाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नौपाडा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी मध्यस्थता करुन दिव्यांग न्याय मिळवून दिली महणून संघटने तर्फे त्यांचा आभार व्यक्त केले.

या आंदोलनात महीला अध्यक्ष  शबनम रैन,दिव्यांग सेनेचे अनिल शिंगणे,दिव्यांग सेवक नारायण पाचारणे,इकबाल काजी,अबदुल रेहमान शेख,मेहबूब इब्राहिम शेख,मेहबूब शेख,अशोक कुमार गुप्ता,संजय यादव,रिमा यादव,हैदर सैय्यद,कादर सैय्यद  आदी संघटनेतील दिव्यांग  पदाधिकारी आणि कार्यकर्ता  सहभागी झाले होते.

Web Title: Divyang welfare fund was not spent, so disabled people protested in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.