दिव्यांगांनी ठाण्यात साजरा केला अनोखा गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:39 AM2021-09-13T04:39:24+5:302021-09-13T04:39:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बाप्पाच्या उत्सवाचा आनंद दिव्यांग मुलांना घेता यावा, त्यांनादेखील गणेश चतुर्थीचे महत्त्व समजावे, यासाठी आदित्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बाप्पाच्या उत्सवाचा आनंद दिव्यांग मुलांना घेता यावा, त्यांनादेखील गणेश चतुर्थीचे महत्त्व समजावे, यासाठी आदित्य प्रतिष्ठान, ठाणे संचलित दिव्यांग कला केंद्रात किरण नाकती यांच्या संकल्पनेतून ‘बाप्पाचे झाड’ या अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाला. विशेष म्हणजे या बाप्पाची पूजा, आरती या केंद्रातील दिव्यांग मुलांनी करत पर्यावरण समतोलाचा संदेश दिला.
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दिव्यांग कलाकेंद्रात साजरा झालेल्या या उत्सवात केंद्रातील दिव्यांग मुलांसह दिव्यांग कला केंद्राच्या मुख्याध्यापिका संध्या नाकती, परेश दळवी, वुई आर फॉर यूचे सर्व सेवेकरी, दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी लाल मातीपासून बनवलेला मात्र त्यात बियांची रुजवण असलेल्या बाप्पाचे दिव्यांग कला केंद्रात आगमन झाले होते. या अनोख्या बाप्पासाठी केवळ रंगीत फुले, विविध पाने आणि झाडांची सुंदर आरास केली होती. दिवसभर उत्सव साजरा केल्यावर त्याचे विधिवत विसर्जन केंद्रातच करण्यात आले.
पुन्हा उमटला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागल्यावर दिव्यांग मुलेदेखील घरात बंदिस्त असल्याने त्यांचे सगळे उपक्रम होते. त्यामुळे घरात राहून ती मुले अधिक आक्रमक आणि चिडचिडी झाली. त्याचा सर्वाधिक त्रास त्यांच्या पालकांना झाला. हीच बाब हेरून या मुलांच्या चेहऱ्यावर हरवलेला आनंद पुन्हा आणण्यासाठी दिव्यांगाचे रक्षाबंधन, दहीहंडी आणि आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाचे झाड गणेशोत्सव असे छोटेखानी सण-उत्सव कोरोना नियमांचे पालन करून साजरे करण्यात आले.