विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:44 AM2021-08-24T04:44:07+5:302021-08-24T04:44:07+5:30
ठाणे : दिव्यांगांच्या वतीने सोमवारी महापालिका मुख्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सात ...
ठाणे : दिव्यांगांच्या वतीने सोमवारी महापालिका मुख्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सात मागण्यांपैकी बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती भाजपचे ठाणे शहर जिल्हाअध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. तसेच कंत्राटी तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पाच टक्के दिव्यांगांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपच्या दिव्यांग सेलच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी ठाणे मनपाने दिव्यांगांना दिलेले स्टॉलसाठी मॉडल रोड/डी पी रोडवर देऊ नये ही अट रद्द करण्यात यावी, तसेच स्टॉलधारकांना तत्काळ परवाना द्यावा, मनपाकडून दिव्यांगांचा वार्षिक निधी २४ हजारांहून ३६ हजार करण्यात यावा, मूकबधिर बांधवांसाठी महापालिकेमध्ये संवाद कक्ष स्थापन करण्यात यावा, महापालिकेने ठेकेदार यांना दिलेले कामे घंटागाडी, गाड्या देखभाल, पथ, ऑफिस साफसफाई, रंगरंगोटी, शोचालय, आदी ठिकाणी पाच टक्क्यांप्रमाणे भरती करावी, स्टॉलवर जाहिरात लावण्याची परवानगी, घरपट्टी माफ करण्यात यावी, बीएसयूपीमधून दिव्यांगांना तीन टक्क्यांप्रमाणे दिलेली घरे पाच टक्क्यांप्रमाणे देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.
या मागण्यांचे निवेदन डावखरे यांच्यासमवेत भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे आणि दिव्यांग सेलच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना दिले. त्यानंतर मूकबधिर बांधवांसाठी महापालिकेमध्ये संवाद कक्ष स्थापन केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच कंत्राटी तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पाच टक्के दिव्यांगांना प्राधान्य दिले जाणार आहे. उर्वरित विषयांसंदर्भात महासभेत चर्चा केली जाईल, असे आश्वासनही देण्यात आल्याची माहिती डावखरे यांनी दिली. त्यानंतर दिव्यांगांनी उपोषण मागे घेतले.