दिव्यांगांचे शैक्षणिक ‘अस्तित्व’ धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 04:12 AM2018-08-30T04:12:18+5:302018-08-30T04:12:39+5:30

वाहतूककोंडी : स्कूलबसचा प्रवास चार तासांचा

Divyang's educational 'existence' threatened! | दिव्यांगांचे शैक्षणिक ‘अस्तित्व’ धोक्यात!

दिव्यांगांचे शैक्षणिक ‘अस्तित्व’ धोक्यात!

Next

कल्याण : कल्याणमधील वाहतूककोंडीचा प्रचंड मनस्ताप डोंबिवली पूर्वेतील एका विशेष शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. वाहतूककोंडीमुळे या दिव्यांग मुलांना दररोज सुमारे चार तास कल्याण महापालिकेच्या बसमध्ये घालवावे लागतात. दिव्यांग मुलामुलींना एवढा वेळ बसमध्ये सांभाळणे, हे कर्मचाऱ्यांसाठी मोठे जिकिरीचे असून त्यामुळे त्रस्त झालेल्या शाळा व्यवस्थापनाने अत्यल्प दराच्या या बसेस बंद करण्याची सूचना परिवहन व्यवस्थापनास केली आहे.

डोंबिवली पूर्वेत दिव्यांग मुलांसाठी अस्तित्व शाळा आहे. या शाळेत मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेतात. दिव्यांगांसाठी मुळात शाळा कमी आहेत. अशा परिस्थितीत अस्तित्व शाळेने दिव्यांगांना शैक्षणिक सुविधा पुरवण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. या शाळेत कल्याण, डोंबिवलीसह पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहनसेवेने दोन बस अत्यल्प दरात पुरवल्या आहेत. कल्याण आणि डोंबिवली शहरांतून दररोज निघणाºया या बसमधून दिव्यांग विद्यार्थी शाळा गाठतात. दोन्ही बसमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकी एक शिक्षिका आणि एक अटेंडंट कार्यरत असतो. कल्याणमधील वाहतूककोंडीची समस्या आता नवीन राहिलेली नाही. पत्रीपुलाच्या कामामुळे या समस्येमध्ये आणखी भर पडली आहे. याचा फटका आता दिव्यांग विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. कल्याण येथून डोंबिवली पूर्वेतील शाळेचे अंतर सुमारे सहा किलोमीटर आहे. मात्र, वाहतूककोंडीमुळे शाळेमध्ये पोहोचण्यास आणि शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यास या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड ते दोन तासांचा विलंब होतो. दिव्यांग मुले तशीच एका ठिकाणी जास्त वेळ बसत नाहीत. त्यामुळे एवढा वेळ त्यांना बसमध्ये सांभाळणे, हे जिकिरीचे काम असते. प्रवासात या मुलांना लघुशंका अथवा शौचासाठी जायचे झाल्यास वाहतूककोंडीत त्यांना कुठे नेणार, हा मोठा प्रश्न बसमधील कर्मचाºयांना पडतो. वाहतूककोंडीची समस्या सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने कल्याण आणि डोंबिवलीतून चालणाºया दोन्ही शालेय बस महापालिकेने १ सप्टेंबरपासून बंद कराव्यात, असे पत्र शाळा व्यवस्थापनाने परिवहन व्यवस्थापनास दिले आहे. दिव्यांग मुलांना पालकांनी शाळेत आणून सोडावे, असे फर्मानही शाळेने काढले असून त्यामुळे पालकांसमोर वेगळीच समस्या उभी ठाकली आहे.

दिव्यांगांना लोकलमध्ये न्यावे तरी कसे?
वाहतूककोंडीसमोर हतबल झालेल्या शाळा व्यवस्थापनाने बसेस बंद करण्यासाठी कल्याण परिवहन सेवेला पत्र दिले असून मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांवर सोपवली आहे.

शाळा व्यवस्थापनाच्या आदेशामुळे आता पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळच्या सत्रात रेल्वेगाड्यांना तुफान गर्दी असते. डोंबिवली स्थानकात धडधाकट प्रवासीही रेल्वेत चढू किंवा उतरू शकत नाही. अशा परिस्थितीत पालकांना त्यांच्या दिव्यांग मुलांसोबत प्रवास करणे शक्य होईल का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

दिव्यांग मुलांना रिक्षाने शाळेत सोडणेही तेवढे सहज नसते. साधारण मुलांसाठी पालक शेअर रिक्षा करू शकतात. मात्र, दिव्यांग मुलांना शेअर रिक्षात नेणे शक्य नसते. त्यामुळे खासगी वाहने नसलेल्या पालकांना आॅटोरिक्षाचे पूर्ण भाडे सोसावे लागेल. ते सर्वांनाच परवडणारे नाही.

Web Title: Divyang's educational 'existence' threatened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.