दिव्यांग निधीसाठी दिव्यांगांनी दिला जेलभरो आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 09:17 PM2021-04-29T21:17:42+5:302021-04-29T21:23:09+5:30
मागील वर्षापासून दिव्यांगांकडून दिव्यांग निधीची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापही ही मागणी पूर्ण केली जात नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात दिव्यांग निधी न दिल्यास मुलाबाळांसह जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी संघटना संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मागील वर्षापासून दिव्यांगांकडून दिव्यांग निधीची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापही ही मागणी पूर्ण केली जात नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात दिव्यांग निधी न दिल्यास मुलाबाळांसह जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी संघटना संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेने ठाणे महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे.
दिव्यांग विकास कामगार संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद युसूफ खान यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, गेल्या वर्षी २३ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यापासून आजतागायत म्हणजेच दुसऱ्याही लॉकडाऊनपर्यंत दिव्यांगांना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. अनेक दिव्यांग हे छोटा मोठा व्यवसाय करु न आपल्यासह कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत. जे दिव्यांग स्टॉल चालवित आहेत; त्या दिव्यांगांच्या स्टॉलवर स्टेशनरी, झेरॉक्स यासारख्या वस्तूंची विक्र ी होत आहे. या सुविधा जीवनावश्यक श्रेणीमध्ये येत नसल्याने दिव्यांगांचे हे स्टॉल बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. परिणामी, दिव्यांगांच्या घरात एकवेळचे अन्न शिजणेही अत्यंत अवघड झाले आहे. सन २०२० मध्ये मध्ये दिव्यांगांना अर्थसाह्य करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अर्ज भरु न घेतले होते. त्यावेळी सुमारे दहा हजार लोकांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, तेंव्हापासून आजतागायत कोणत्याही प्रकारचे अर्थसाह्य देण्यात आलेले नाही.
केंद्र सरकारसह न्यायालयाने दिव्यांगांची उपासमार होऊ नये, यासाठी त्यांना अर्थसाह्य करावे, अशा सूचना केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी ठामपाकडून झालेली नाही. अर्थसंकल्पातही दिव्यांग निधीची तरतूद असतानाही त्याचे वितरण करण्यात येत नाही. त्यामुळे दिव्यांगांना उपाशी मरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. याचा विचार करु न त्यांना तत्काळ निधीचे वाटप करावे. अन्यथा, सर्व दिव्यांग आपल्या मुलाबाळांसह महामारी अधिनयम १८९७ चा भंग करु न जेलभरो आंदोलन करु न कारागृहात जाण्याचा मार्ग पत्करतील, असा इशाराही खान यांनी दिला आहे.