बॅकस्टेज कलाकारांच्या आयुष्यात दिवाळीत ‘ब्लॅकआउट’; शेती करून, वाहन चालवून करतोय गुजराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 11:58 PM2020-11-08T23:58:06+5:302020-11-08T23:58:21+5:30
काटकसर करीत करणार दिवाळी साजरी
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : लॉकडाऊनकाळात रंगभूमीवर काम करणाऱ्या बॅकस्टेज कलाकारांचे अतोनात हाल झाले आहेत. कुणी ट्रक चालवून, कुणी भाजी विकून, तर कुणी शेती करून आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहे. दरवर्षी नवीन कपडे, वस्तू खरेदी करून साजरी केली जाणारी दिवाळी यंदा कशी साजरी करावी, याची विवंचना या कलाकारांनी व्यक्त केली.
सुरुवातीच्या काळात एक-दोन महिने बॅकस्टेज कलाकार घरातच बसून होते. जसा काळ वाढू लागला, तसा त्यांना उदरनिर्वाहासाठी पर्याय शोधावा लागला. पोटापाण्यासाठी काहींनी भाजी विकणे, ट्रक चालवणे, ड्रायव्हिंग करणे, शेती करणे असे मार्ग शोधले. मी किरकोळ सामान विकून घर चालवत आहे. त्यातून भागत नाही म्हणून एकदोन छोटी कामेदेखील हातात घेतली होती. पण, जे आपले काम नाही त्यात काम करणे कठीण जाते, असे वैभव पिसाट यांनी सांगितले.
अ.भा. मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखेने या कलाकारांना फुल ना फुलाची पाकळी मदत केली. परंतु, या कलाकारांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रंगभूमी पूर्वपदावर यायला वेळ लागेल. तोपर्यंत या कलाकारांची जबाबदारी सरकारने घ्यावी. - अशोक नारकर, नियामक मंडळ, सदस्य
लॉकडाऊनकाळात गावी आलो, पण येथेही काम नसल्याने मी भातशेती करत आहे. पोट भरण्यासाठी गावात भाजीपण विकली. आता शेतीवर माझे कुटुंब जगवत आहे. दिवाळी मात्र पूर्वीसारखी जाणार नाही. नाट्यगृह सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी नेमकी कधी सुरु हाेतील याचा अंदाज नाही. - राजेश सपकाळ