जल्लोषात रंगली दिवाळी पहाट, ठाणेकरांची प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 03:51 AM2018-11-07T03:51:46+5:302018-11-07T03:52:22+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाट अर्थात दिवाळीचा पहिला दिवस रंगला तो तरुणाईच्या लक्षणीय उपस्थितीने. एकीकडे ढोल ताशांचा गजर तर दुसरीकडे डीजे दणदणाट होता.

Diwali celebration in Thane | जल्लोषात रंगली दिवाळी पहाट, ठाणेकरांची प्रचंड गर्दी

जल्लोषात रंगली दिवाळी पहाट, ठाणेकरांची प्रचंड गर्दी

googlenewsNext

ठाणे - दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाट अर्थात दिवाळीचा पहिला दिवस रंगला तो तरुणाईच्या लक्षणीय उपस्थितीने. एकीकडे ढोल ताशांचा गजर तर दुसरीकडे डीजे दणदणाट होता. यात रंगत वाढवली ती आगरी कोळी ब्रास बँडने. कोळी गीतांवर समस्त तरुणाईने ठेका धरला तर त्यावेळी उपस्थित असलेल्या मोठ्यांनाही ताल धरण्याचा मोह आवरला नाही. नृत्य, गाणी आणि जल्लोषात ही पहाट रंगत गेली.
नरक चतुर्दशीला राम मारुती रोड, तलावपाळी येथे एकत्र जमून दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा तरुणाईने राखली. सकाळी सहा वाजल्यापासून राम मारुती रोड, तलावपाळी, गोखले रोड यांठिकाणी तरुणाईने येण्यास सुरुवात केली. सकाळी ८ वाजता ही ठिकाणे गर्दीने तुडुंब भरली. राम मारुती रोड व तलावपाळी हे गर्दीने तर ओसंडून वाहत होते.
राम मारुती रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलजवळ ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्यावतीने आगरी कोळी ब्रास बँड, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स समोर ठाणे युवाच्यावतीने डीजे, रॉक बँड, राम मारुती रोडवर द ब्रदर्स प्रतिष्ठानच्यावतीने आणि तलावपाळी येथे खा. राजन विचारे यांच्यावतीने डीजेचे आयोजन केले होते. या ठिकाणी ढोल ताशांचाही गजर झाला. गोव्याच्या किनाऱ्यावर, ही पोळी साजूक तुपातली, आगरी कोळी बँड, स्वॅग से करेंगे सबका स्वागत, ऐका दाजीबा, हम्मा हम्मा, काला चष्मा, छोगारा तारा.., ‘या कोळीवाड्याची शान’ यासारख्या मराठी - हिंदी गाण्यांवर तरुणाई थिरकत होती. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. राम मारुती रोड येथील गर्दी पाहता या ठिकाणी येणारे काही रस्ते बंद केले होते. तरुणाईला शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, आ. संजय केळकर, भाजपच्या अ‍ॅड. माधवी नाईक, सभागृह नेते नरेश म्हस्के, आ. निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते. वंदे मातरम संघच्यावतीने नृत्य आणि फॅशन शो आयोजित केला होता.

हॉटेलमध्ये गर्दी
दुपारी १२ वाजल्यानंतर गर्दी ओसरण्यास सुरुवात झाली आणि सकाळपासून दिवाळी पहाटला आलेल्या तरुणाईने जवळच्या हॉटेल्समध्ये गर्दी केली. अनेक जण वेटिंगमध्येही होते.

प्लॅस्टिक बाटल्या रस्त्यावर
दिवाळी पहाटमध्ये काही ठिकाणी तरुणांनी पाणी पिऊन झाल्यावर पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या रस्त्यावर फेकून दिल्याचे नजरेस पडत होते.

इंडो वेस्टर्न, पारंपरिक वेशभूषा
पारंपरिक पोशाखाबरोबर काहींनी इंडो वेस्टर्न पोशाख परिधान केला होता. काहींनी दक्षिण भारताची वेशभूषा केली होती. काही जण तर हेल्मेट घालून सहभागी झाले होते.

चिमुकलीचा डान्स
दिवाळी पहाट म्हटली की तरुणाईचा जल्लोष असतो; परंतु या पहाटमध्ये मन जिंकले ते चिमुकल्या अनुश्रीने. तिने वंदे मातर संघ आयोजित केलेल्या दिवाळी पहाटमध्ये ‘मैं कोल्हापूर से आयी हुँ’ या गाण्यावर ठेका धरून उपस्थितांची मने जिंकली.

विष्णुनगरात वाहतूककोंडी
विष्णुनगर हा रस्ता सकाळी पूर्णपणे वाहतूककोंडीत अडकला होता. या रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूककोंडी असते; परंतु दिवाळी पहाटच्या दिवशी गर्दी वाढल्यामुळे तो पूर्णपणे ठप्प झाला होता. चारही बाजूने गाड्या मध्येच घुसत असल्याने एकेका ठिकाणी अर्धा - पाऊणतास तातकळत राहावे लागत होते.

संजय वाघुलेंनीही धरला ठेका
ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी आयोजित केलेल्या ब्रास बँडवर मराठी - हिंदी गाण्यांबरोबर कोळी गीते वाजविली जात होती. या वेळी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही वाघुले यांना नाचण्याचा मोह आवरला नाही. पाच मिनिटे त्यांनीही कोळी गाण्यांवर तरुणाईसोबत ठेका धरला.

नेटवर्क जाम
गर्दीमुळे मोबाइल्सचे नेटवर्क जाम झाले होते. कोणाचेही फोन लागत नसल्याने सर्वच जण वैतागले होते. नेटवर्क शोधण्याची धावपळ सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून शहरात कधी थंड तर मध्येच उकाडा वाढत असल्याने मंगळवारी दिवाळी पहाटच्या दिवशी घामाच्या धारांनी तरुणाई त्रासली गेली. गर्दीमुळे उकाड्याचा त्रास अधिक जाणवला.

...अन हिरव्या दिवाळीने ‘मोरु’ झोपूनच राहिला


ठाणे : ठाणे, डोंबिवली किंवा बदलापूरचा ‘मोरु’ फटाक्यांनी जाग येईल या कल्पनेनी सोमवारी रात्री झोपी गेला. मोरुच्या बापाने पहाटेचा गजर लावला होता. मात्र तो नेहमीप्रमाणे वाजलाच नाही. न्यायालयाने लागू केलेली फटाकेबंदी ठाणेकरांनी मनावर घेऊन फटाक्याला फाटा दिल्याने मोरुच्या बापाचे डोळे उघडले तोवर चांगलच उजाडलं होतं. मोरुच्या बापाने मोरुला उठवले. डोळे चोळत उठलेल मोरु आपल्या उत्तुंग इमारतीमधील फ्लॅटच्या गॅलरीत गेला. पाहतो तर ठाणेकरांनी घराघरावर रोषणाई केली होती. ठाणेकर पहाटेच जागे झाले होते. मात्र कुठूनही फटाक्यांच्या लडी फुटण्याचे किंवा सुतळी बॉम्बचा छातीत धडकी भरवणारे आवाज येत नव्हते.
मोरु काही काळ गॅलरीत रेंगाळला. फटाके वाजतील, अशी अपेक्षा त्याला होती. मात्र फटाके वाजलेच नाहीत. मग मात्र मोरुला जुने दिवस आठवले. अभ्यंगस्नानाच्या दिवशी सर्वप्रथम कुणाची माळ वाजते व सगळ््यात अगोदर सुतळी बॉम्ब किंवा लक्ष्मी बार लावून साºयांना कोण उठवतो, याची स्पर्धा असायची. इमारतीच्या जिन्यात फटाक्यांची लड पेटवून भिरकावली की तिचा आवाज आठ-दहा घरांमधील झोपलेल्यांना जागं करायचा. पहाटेच अांघोळ केल्यावर मोरु मित्रमंडळींसमवेत फटाके फोडायला बाहेर पडायचा. उन्हं वर येईपर्यंत फटाके फोडण्यात रममाण व्हायचा. सायंकाळी मोरु पुन्हा बापासमोर उभा राहून फटाक्यांकरिता पैसे मागायचा तेव्हा बापाच्या तोंडातून शाब्दीक फटाक्यांच्या लडी फुटत आणि एखाद्या सणसणीत शिवीचा सुतळी बॉम्ब ढम्म आवाज करीत असे. ठाणेकरांनी कायद्याचे, न्यायालयाच्या आदेशाचे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी केलेले पालन पाहून मोरु मनोमन सुखावला.

फटाके झाले फूस

अनेक बेरोजगार तरुणांनी रोजगाराच्या आशेनी फटाक्यांचे स्टॉल्स सुरु केले आहेत; परंतु फटाके वाजवण्यावरील बंदी व त्यातच हा खर्च वायफळ असल्याची बहुतांश सुशिक्षित मध्यमवर्गीयांची झालेली धारणा यामुळे यंदा फटाक्यांचा बाजार उठला आहे. गेल्या वर्षी ५०० रुपयांना मिळणारे लक्ष्मी बार २०० ते २२५ रुपयांना मिळत आहेत. तीच गत माळांची आहे. फुलबाज्याही स्वस्त झाल्या आहेत. केपा उडवण्याच्या बंदुकांनाही बंदीची झळ बसली आहे.

Web Title: Diwali celebration in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.