Diwali Firecrackers : उच्चभ्रू लोकवस्तीत ध्वनी प्रदुषणाची तीव्रता अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 04:26 PM2021-11-06T16:26:51+5:302021-11-06T16:27:06+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ध्वनिप्रदूषण वाढले असल्याचे आले समोर
ठाणे : मागील वर्षी कोरोनाच्या सावटाखाली दिवाळी देखील साधेपणाने साजरी झाली होती. त्यामुळे फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणातही घट झाल्याचे दिसून आले होते. परंतु यंदा मात्र निर्बंध शिथील झाल्याने फटाक्यांची आतषबाजीने ठाणे शहर दुमदुमुन गेले होते. तसेच नियमांची पायमल्ली उच्चभ्रू परिसरातीलच नागरिकांकडून झाली आहे. ४ नोव्हेंबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ८ ते १०.३० या अडीच तासात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ध्वनिप्रदूषण वाढले असल्याचे डॉ. महेश बेडेकर यांनी केलेल्या आवाजांच्या नोंदणीमधून उघड झाले आहे. त्यातही सर्वाधिक ध्वनिप्रदूषण हे उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या हिरानंदानी मेडोज आणि हिरानंदानी इस्टेस्ट या परिसरात झाले असून या परिसरात आवाजाची पातळी ही १०० डेसिबल पेक्षा अधिक नोंदवण्यात आली आहे.
फटाक्यांच्या आतषबाजीने ध्वनिप्रदूषण आणि शहरातील हवेची गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सहापासून सुरू झालेल्या फटाक्यांची आतषबाजी मध्यरात्रीपर्यंत सुरूच होती. पाचपाखाडी आणि हिरानंदानी मेडोज परिसरातील रस्त्यांवर आवाजाची तीव्रता १०० ते १०५ डेसिबल इतकी प्रचंड वाढली होती. याशिवाय राम मारुती रोड, पाचपाखाडी, गोखले रोड, ठाणे पूर्व या भागात देखील आवाजाची पातळी ही ९० ते ९५ डेसिबल इतकी नोंदवण्यात आली आहे. ही आवाजाची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे डॉ. महेश बेडेकर यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेल्या आवाजाच्या नोंदीवरून स्पष्ट केले आहे.
दिवाळीतील शोभीवंत फटाक्यांची संख्या वर्षागणिक वाढतच असून त्यामुळे हवेच्या प्रदूषणातही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. दिवाळीत ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे तज्ञाचे म्हणणो आहे. फटाके वाजवल्याने हवा आणि वातावरण दूषित होते. कोरोना झालेल्या रुग्णांना तसेच बरे झालेल्या व्यक्तींनादेखील दिवाळीत होणाऱ्या हवा प्रदूषणाचा त्रास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे दिवाळी ध्वनिप्रदूषण विरिहत, फटाकेमुक्त तसेच पर्यावरण पूरक साजरी करून यंदाची दिवाळीची तेजोमय साजरी करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केले होते. मात्र या आवाहनाला उचभ्रू परिसरातील नागरिकांनीच केराची टोपली दाखविली असल्याचे दिसून आले आहे.