दिवाळीत ध्वनीच्या पातळीत झाली वाढ, मागील वर्षीच्या तुलनेत प्रमाण मात्र कमी, हवेच्या प्रदुषणातही झाली घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 04:23 PM2018-11-09T16:23:05+5:302018-11-09T16:28:03+5:30
दिवाळीच्या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत हवेच्या प्रदुषणात घट झाल्याचे दिसून आले आहे. परंतु दुसरीकडे ध्वनीच्या प्रदुषणात घट झाली असली तरीसुध्दा मर्यादेपेक्षा ध्वनीची पातळी ११० डेसीबल पर्यंत गेल्याचे आढळलून आले आहे.
ठाणे - न्यायालयाने आदेश दिल्याने त्याचे पडसाद ठाण्यात दिसून आले आहेत. दिवाळी पहाटच्या वेळेस फटाक्यांची आतषबाजी झाली नाही. परंतु उर्वरीत चार दिवसात फटाक्यांची आतषबाजी झाली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १५ ते २० टक्यांनी कमी झाले आहे. तर ध्वनीची पातळीसुध्दा शहरातील केवळ पाचपाखाडी आणि हिरानंदानी मेडोज येथे ११० डेसीबलपर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. परंतु दुसरीकडे हवेची गुणवत्तासुध्दा मागील वर्षीच्या तुलनेत चांगली आढळली असल्याची माहिती महापालिकेच्या प्रदुषण विभागाने दिली आहे.
यंदा दिवाळीत केवळ रात्री ८ ते १० यावेळेतच फटाके फोडावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे पालन दिवाळी पहाटच्या दिवशी झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे. शहरातील राम मारुती रोड, गोखले रोड, पाचपाखाडी, वर्तकनगर, हिरानंदानी मेडोज आदी भागात फटाक्यांची आतषबाजी झाली नसल्याची नोंद बेडेकर यांनी केली आहे. परंतु या कालावधीत ध्वनीची पातळी ही राम मारुती रोड भागात १०० ते १०५ डेसीबल पर्यंत गेली होती. परंतु इतर भागात मात्र हे प्रमाण ९० डेसीबलपर्यंत आढळून आले आहे. दुसरीकडे ७ नोव्हेंबरच्या दिवशी सांयकाळी ७.३० च्या सुमारास राम मारुती रोड या भागात फटाक्यांमुळे ९० डेसीबल पर्यंत ध्वनी प्रदुषण आढळून आले. तर पाचपाखाडी भागात हेच प्रमाण ११० डेसीबल पर्यंत गेले. त्यातही रात्री ११ च्या नंतर आवाजाचे हे प्रमाण १०० डेसीबल पर्यंत गेले होते. तर हिरानंदानी मेडोज मध्ये रात्री ९.३० पर्यंत फटाक्यांच्या आवाजामुळे १०५ डेसीबल पर्यंत ध्वनीची पातळी गेली होती. तर ९.४५ वाजता हिरानंदानी इस्टेट भागात हे प्रमाण १०५ डेसीबल इतके आढळून आले. दरम्यान ८ नोव्हेंबर रोजी राम मारुती रोड येथे फटाक्यांमुळे ध्वनीची पातळी ७५ डेसीबल, पाचपाखाडी भागात ९५ डेसीबल, वर्तकनगर भागात १०० डेसीबल आणि हिरानंदानी मेडोज मध्ये ९५ डेसीबल पर्यंत आढळून आले आहे.
एकूणच डॉ. बेडेकर यांनी केलेल्या सर्व्हेत मागील वर्षीच्या तुलनेत फटाके वाजविण्याच्या प्रमाणात १५ ते २० टक्यांची घट झाल्याचे आढळून आले आहे. लक्ष्मी पुजनाच्या दिवशी रात्री ७ ते ११ वाजेपर्यंत अधिक प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली असून यावेळेत आवाजीची तीव्रता ११० डेसीबल पर्यंत गेली होती. त्यातही पाचपाखाडी आणि हिरानंदानी मेडोज भागात हे प्रमाण अधिक आढळून आले आहे.
दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण मंडळाने याच कालावधीत केलेल्या हवा आणि ध्वनी प्रदुषणाच्या गुणवत्तेच्या चाचणीत हवेतील प्रदुषणात मागील वर्षीच्या तुलनेत काहीशी घट झाल्याचे आढळले आहे. दिवाळी पूर्वी पर्यंत सल्फरडाय आॅक्साईड (एसओटू) चे प्रमाण हे १९ तर दिवाळी दरम्यान हे प्रमाण २५ पर्यंत गेले होते. तर नायट्रोजन आॅक्साईडचे प्रमाण हे आधी ५५ इतके होते. तर दिवाळीच्या कालावधीत ते प्रमाण ६७ वर गेल्याचे दिसून आले. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण काही अंशी कमी असले तरी सुध्दा मर्यादेपेक्षा जास्तीचे प्रदुषण झाल्याचेही नमुद करण्यात आले आहे. धुलीकणांचे प्रमाणतही निर्धारीत मर्यादेपेक्षा २ पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी सांयकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधीक म्हणजेच २५५ इतके आढळले आहे. तर नायट्रोजन आॅक्साइडचे प्रमाण ७२ आणि सल्फरडाय आॅक्साइडचे प्रमाण २८ एवढे आढळून आले आहे. परंतु ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण हे मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढल्याचे प्रदुषण विभागाने स्पष्ट केले आहे. एकूणच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हवेतील प्रदुषणात काही प्रमाणात घट झाल्याचे प्रदुषण विभागाने स्पष्ट केले आहे.