बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन, एकूण ७० स्टॉल्स; उल्हासनगर महापालिकेचा दिवाळी बाजार फुलला
By सदानंद नाईक | Published: November 7, 2023 02:01 PM2023-11-07T14:01:23+5:302023-11-07T14:02:21+5:30
महापालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत बचत गटातील गरीब व गरजू महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी दसरा मैदान येथे दिवाळी बाजाराचे आयोजन केले.
सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत बचत गटातील गरीब व गरजू महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी दसरा मैदान येथे दिवाळी बाजाराचे आयोजन केले. आमदार कुमार आयलानी, आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते सोमवारी दिवाळी बाजाराचें उदघाटन करण्यात आले आहे.
उल्हासनगर महापालिकेने बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात दिवाळी बाजाराचे आयोजन केले. दिवाळी बाजारात एकून ७० स्टॉल उभारले असून ६ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दिवाळी बाजार सुरू राहणार आहे. बाजारात दिवाळी फराळा मध्ये चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, अनारसे, शेव, चिवडा आदींसह पणत्या, रांगोळी, दिवमाळा, आकाश कंदिल विक्रीस ठेवले आहे. तर खाद्यपदार्थ-मध्ये वांग्याचे भरीत, पिठल-भाकर, मांडे, सॉस, शीतपेये, सोलकढी, लोणची, पापड, विविध मसाल. तयार पिठे, शेवया, कुरडया या व्यतिरिक्त बिर्याणी व इतर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थाचे विविध प्रकार ठेवले आहे.
दिवाळी बाजारात घरघुती वापरातील लाकडी खेळणी, स्वेटर्स, तयार कपडे, फिनाईल, तोरण, लोखंडी तवे. आयुर्वेदिक उत्पादने, लेदर-कापडी पिशव्या, कापडी फाईल, फोल्डर, पेपर प्रॉडक्टस, ज्वेलरी व सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती आदी स्टॉल्स दिवाळी बाजारात उपलब्ध आहेत. दिवाळी बाजाराचे उदघाटन आमदार कुमार आयलानी, आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते झाले असून यावेळी उपायुक्त सुभाष जाधव, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परिक्षक शरद देशमुख, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, व्यवस्थापक संजिवनी अमृतसागर, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख नितेश रंगारी आदीजन उपस्थित होते.