धामणवाडीच्या आदिवासी कुटुंबांची दिवाळी झाली गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:13 AM2020-11-16T00:13:23+5:302020-11-16T00:13:49+5:30
बदलापूरमधील आशीष गोळे यांनी आदिवासी बांधवांची दिवाळी गोड केली आहे. कोंडेश्वर परिसरात त्यांच्या मालकीची जागा असून त्या जागेपैकी काही जागेवर आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत.
पंकज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : दिवाळीनिमित्त आदिवासींना फराळ वाटणारे अनेक पाहिले असतील. मात्र, बदलापूरमधील एका बांधकाम व्यावसायिकाने चक्क आपल्या मालकीची जागाच आदिवासींना घरासाठी दिली आहे. आपली मालकी हक्काची जागा आदिवासी बांधवांना घरासाठी देत त्या आदिवासींची दिवाळी गोड केली आहे.
बदलापूरमधील आशीष गोळे यांनी आदिवासी बांधवांची दिवाळी गोड केली आहे. कोंडेश्वर परिसरात त्यांच्या मालकीची जागा असून त्या जागेपैकी काही जागेवर आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र, ही जागा खाजगी असल्याने त्यांचे घर त्यांच्या नावे होत नव्हते. तसेच इतर कोणतीही सुविधा पुरविताना जागामालकाची परवानगी घ्यावी लागत होती. या सर्व अडचणी लक्षात आल्यावर आमदार किसन कथोरे यांनी या आदिवासींचा प्रश्न निकाली काढण्यासाठी गोळे यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता. गोळे यांनीही कोणताही विलंब न लावता या आदिवासी बांधवांना दिवाळी भेट दिली आहे. कोंडेश्वरजवळच असलेल्या धामणवाडी परिसरात ११० आदिवासी कुटुंबेेेे वास्तव्यास आहेत.
भोज धरणाच्या किना-यावर हे सर्व आदिवासी असून त्यांची घरे खाजगी जागेवर आहेत. त्यामुळे त्यांची घरे त्यांच्या नावावर होणे अवघड जात होते. त्यामुळे दिवाळीची भेट म्हणून गोळे यांनी या आदिवासींची घरे असलेली जागा त्यांच्या नावावर करून देण्याचा निर्णय घेतला आहे. गोळे यांच्या या निर्णयामुळे आदिवासींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
या आदिवासी बांधवांचे आमच्यासोबतचे नाते हे कुटुंबाप्रमाणे आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्याला त्याच्या घराची जागा दिली, तर त्याचा आनंदच आम्हाला होत आहे. त्यांनीही प्रत्येकवेळी आम्हाला मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद देण्याचा हा लहानसा प्रयत्न आहे.
- आशीष गोळे, जमीनमालक
आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी आमच्या हा प्रयत्न होता. हे आदिवासी अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहतात. त्यांच्या कुटुंबाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे ११० कुटुंबांची कायमची सोय करण्यात आली आहे. भविष्यात आता कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत.
- किसन कथोरे, आमदार