दिवावासीयांना उत्तम आरोग्यसुविधा गरजेच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:47 AM2021-02-17T04:47:43+5:302021-02-17T04:47:43+5:30
ठाणे : दिव्यातील आरोग्य केंद्राचा प्रश्न आपण येणाऱ्या अधिवेशनात उपस्थित करणार असून, येथील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी ...
ठाणे : दिव्यातील आरोग्य केंद्राचा प्रश्न आपण येणाऱ्या अधिवेशनात उपस्थित करणार असून, येथील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी भाजप आग्रही आहे, अशी ठाम भूमिका भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिवा दौऱ्यादरम्यान व्यक्त केली.
दिव्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी ठाणे भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकताच दौरा केला. या वेळी पालिका व सत्ताधारी सेनेच्या कारभारावर डावखरे यांनी टीका केली. दिवा शहरात पाण्याची समस्या गंभीर असूनदेखील नागरिकांना पाणी देण्याचे नियोजन अद्याप महापालिका आणि सत्ताधारी शिवसेना करू शकले नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. नागरिकांना गृहीत धरण्याचे काम केले जात असून, दिवा शहरासाठी महत्त्वाचे असणारे आरोग्य केंद्र लवकरात लवकर झाले पाहिजे, त्यासाठी आरक्षित भूखंड पालिकेने ताब्यात घेतला पाहिजे. यासाठी हा विषय येणाऱ्या अधिवेशनात उपस्थित करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी त्यांच्याबरोबर भाजप गटनेते संजय वाघुले, नगरसेवक कृष्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नीलेश पाटील, कार्यकारिणी सदस्य रोहिदास मुंडे, विजय भोईर, मंडळ अध्यक्ष आदेश भगत, सचिन भोईर, रोशन भगत, जयदीप भोईर, प्रशांत आंबोनकार, विजय वायदांडे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट - महापालिका आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांची भेट घेऊन या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी मागणी डावखरे यांनी केली आहे.