बदलापूरच्या पणत्यांनी उजळणार परदेशातील दिवाळी

By पंकज पाटील | Published: October 19, 2023 07:05 PM2023-10-19T19:05:19+5:302023-10-19T19:07:29+5:30

परदेशातील भारतीयांच्या, उत्सवांना पारंपरिक साज देण्याचे काम बदलापुरात एक तरुण करत असून यंदाही अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासह आखाती देशांमधील दिवाळी बदलापुरच्या पणत्यांनी प्रकाशमान होणार आहे.

diya of Badlapur will light up Diwali abroad | बदलापूरच्या पणत्यांनी उजळणार परदेशातील दिवाळी

बदलापूरच्या पणत्यांनी उजळणार परदेशातील दिवाळी

बदलापूर : जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी भारतीय हा आपल्या पारंपरिक सण आणि उत्सवांना साजरा करण्यात कोठेही मागे राहत नाही. त्यामुळेच प्रत्येक सणवारानुसार परदेशात उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी देखील केली जाते. त्यानुसारच बदलापुरातील चिंतामणी क्रिएशनच्या वतीने तब्बल 15 लाखाहून अधिक दिवे पाठवण्यात आले आहेत. यंदा परदेशातील दिवाळी बदलापूरच्या दिव्यांमुळे प्रकाशमय होणार आहे. 

परदेशातील भारतीयांच्या, उत्सवांना पारंपरिक साज देण्याचे काम बदलापुरात एक तरुण करत असून यंदाही अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासह आखाती देशांमधील दिवाळी बदलापुरच्या पणत्यांनी प्रकाशमान होणार आहे. बदलापुरातील निमेश जनवाड यांनी यंदाही लाखो पणत्या विविध देशात रवाना केल्या आहेत. बदलापुरात एक सर्वसामान्य कुटुंबातील निमेश जनवाड यांनी चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून सर्व भारतीय सणांच्या वस्तूचे निर्मिती करून त्यांची निर्यात करण्याचे काम काही वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले होते. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवासाठी निमेश जनवाड यांनी लहान मोठ्या अशा जवळपास ७० हजारहून अधिक पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जगभरात विविध देशांमध्ये पाठवल्या.

गणेश मूर्तींची निर्यात मार्च महिन्यापासून ते जुलै अखेरपर्यंत केली जाते. या सर्व मूर्ती जलमार्गे विविध देशांत पाठवल्या जातात. यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, कॅनडा, इंग्लंड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, अबुधाबी, बहरीन, मॉरीशियस, जपान अशा विविध देशांचा समावेश आहे. गणेशोत्सवानंतर, नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळी हे महत्वाचे सण परदेशात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून यंदाही नवरात्री, दसरा आणि दिवाळीकरिता मातीच्या विविध रूपातील वेगवेगळ्या आकाराच्या सुबक पणत्या परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळीही बदलापूरच्या पणत्यांनी प्रकाशमान होणार आहे. या वर्षात पंधरा लाख विविध आकारांच्या विविध पणत्यांचे सेट पाठवण्यात आले आहेत. चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून पणत्यांची निर्मिती स्थानिक महिलांच्या मदतीने केली जाते. त्यामुळे गृहिणींना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. घरोघरी महिलांना पणत्यांचे रंगकाम आणि सजावटीचे काम करण्याकरिता दिले जाते.

 ''भारताप्रमाणे प्रदेशात आपले सण आणि उत्सव साजरे होतात आणि तो सण आणि उत्सव आपण गोड करण्याचा प्रयत्न करतोय याचे समाधान वाटते.
 - निमेश जनवाड, चिंतामणी क्रिएशनचे प्रमुख

Web Title: diya of Badlapur will light up Diwali abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.