गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत वाजवा डीजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:11 AM2018-09-15T03:11:47+5:302018-09-15T03:12:03+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी : पोलिसांना केल्या सूचना, ध्वनिमर्यादा पाळण्याचे आदेश

DJ to play Ganesh festival by 12 o'clock in the night! | गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत वाजवा डीजे!

गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत वाजवा डीजे!

Next

- सुरेश लोखंडे 

ठाणे : ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी विविध अटींसह ध्वनीची विहित मर्यादा राखून गणपतीच्या या कालावधीसह नवरात्रोत्सवात सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत डीजे वाजवण्यास जिल्हा प्रशासनाने सहमती दर्शवली आहे. याशिवाय, अन्य सणासुदीच्या कालावधीतही ध्वनिमर्यादा राखून डीजे वाजवण्यासाठी मार्गदर्शक सूचानाही पोलिसांना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत.
उच्च न्यायालयातील जनहित याचिका, पर्यावरण विभागाचे आदेश आदींचा संदर्भ देऊन नियमांचे पालन करून ध्वनीची मर्यादा राखून डीजे वाजवण्यासही परवानगी जारी केली आहे. कोणत्याही प्रकारचे ध्वनिप्रदूषण होणार नसल्याची काळजी घेण्याच्या सूचना गणपती मंडळांना पोलिसांनी जारी केल्या आहेत. यामुळे डीजेचा आवाज ठिकठिकाणी मंदावलेला ऐकायला मिळत आहे. श्रोतागृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी डीजेला ध्वनीची विहित मर्यादा राखून वाजवण्यास परवानगी केली आहे.
सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत डीजे वाजवण्यास परवानगी असली, तरी त्यासाठी दिवसही निश्चित केले आहेत. यामध्ये गणपती उत्सवादरम्यान केवळ चार दिवस डीजे वाजवण्याची मुभा आहे. यामध्ये दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी आदी दिवशी डीजे वाजवता येणार आहे. गणपतीनंतर नवरात्रोत्सवातीलही काही दिवस डीजे वाजवण्यासाठी निश्चित केले आहेत. यामध्ये अष्टमी व नवमीचा समावेश आहे. दिवाळीत केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डीजे वाजवता येईल. तर, ख्रिसमसला एक दिवस आणि ३१ डिसेंबरला केवळ एक दिवस डीजे वाजवण्याची मुभा देण्यात आली आहे.

वर्षभरातील सणांसाठी मिळणार सवलत पण मर्यादा पाळून
या सणांच्या दिवसांप्रमाणेच वर्षभरात येणाºया सणांसाठीदेखील डीजेची ध्वनिमर्यादा राखण्याचे सूचित केले आहे. यामध्ये शिव जयंती, ईद-ए-मिलाद, आंबेडकर जयंती, १ मे महाराष्टÑ दिन आदी दिवशीदेखील ध्वनीची मर्यादा राखून डीजे वाजवता येणार आहे.
यासाठीदेखील सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंतच ध्वनिमर्यादा राखून डीजे वाजवता येणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त अतिरेक करून ध्वनिप्रदूषण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिले आहेत.
यास अनुसरून सध्या सुरू असलेल्या या गणेशोत्सवाच्या कालावधीत ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी पोलिसांसह गणेश मंडळांकडून घेतली जात असल्याचे दिसते आहे. भक्तांनी देखील या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: DJ to play Ganesh festival by 12 o'clock in the night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.